Health Benefits Of Sunlight : निरोगी राहण्यासाठी दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात. पहिली म्हणजे आहार आणि दुसरी म्हणजे नियमित व्यायाम. चांगल्या आरोग्याबाबत बोलताना बहुतेक लोक फक्त आहारावर फोकस करतात. काही लोक पोषण मिळणारं अन्न खातात, तर काही जण सप्लिमेंट्स घेतात. पण तुम्हाला माहित आहे का की, रोजची थोडीशी सूर्यकिरणं सुद्धा तुम्हाला निरोगी ठेवण्यात मोठी भूमिका बजावतात
न्युरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी सोशल मीडिया X प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करून सूर्यप्रकाशाचे फायदे सांगितले आहेत. त्यांनी सांगितले की, सूर्यप्रकाश फक्त शरीरातील व्हिटामिन D वाढवत नाही, तर अनेक इतर आरोग्यदायी फायदे देखील देतं. रोज २० ते ३० मिनिटं सकाळी किंवा दुपारी उशिरा सूर्यप्रकाशात राहिल्यानं शरीराला नैसर्गिकरित्या अनेक फायदे होतात. चला, जाणून घेऊ या
सूर्यप्रकाशाचे आश्चर्यकारक फायदे
हृदयाचं आरोग्य सुधारतं
थोडासा UV प्रकाश ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतो आणि हृदयविकाराचा धोका कमी करतो. त्यामुळे सूर्यप्रकाश हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यात मदत करतो.
मूड सुधारतो
सूर्यप्रकाश फक्त शारीरिकच नाही, तर मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर असतो. सूर्यप्रकाशामुळे सेराटोनिन नावाचा हार्मोन सक्रिय होतो, ज्यामुळे ऊर्जा वाढते आणि मन प्रसन्न राहतं.
झोपेची क्वालिटी सुधारते
चांगली झोप ही निरोगी शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. सकाळची सूर्यकिरणं शरीरातील बायोलॉजिकल क्लॉक रीसेट करतात, ज्यामुळे गाढ आणि शांत झोप लागते.
हाडे आणि स्नायू मजबूत होतात
सूर्यप्रकाशामुळे शरीरात व्हिटॅमिन D तयार होतं, जे कॅल्शियम शोषण वाढवते. त्यामुळे हाडं मजबूत होतात आणि स्नायूंचं कार्य सुधारतं.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
रोज थोडा वेळ सूर्यप्रकाशात घालवल्याने इम्युनिटी मजबूत होते. त्यामुळे शरीर अनेक आजारांपासून आणि संसर्गांपासून सुरक्षित राहतं.
दीर्घायुष्य मिळू शकतं
ज्यांना नियमितपणे सूर्यप्रकाश मिळतो, ते लोक सामान्यतः अधिक निरोगी आणि दीर्घायुषी असतात. सूर्यप्रकाश शरीरातील जैविक प्रक्रिया संतुलित ठेवतो.
काही गोष्टी लक्षात ठेवा
दुपारच्या तीव्र उन्हात जास्त वेळ राहू नका. डोळ्यांची आणि त्वचेची काळजी घ्या. सनस्क्रीन, टोपी किंवा चष्म्याचा वापर करा.
उन्हात बसण्याची योग्य वेळ
एक्सपर्टनुसार, हिवाळ्यात सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत उन्हात बसणे सगळ्यात चांगलं असतं. असं केल्याने शरीराला आवश्यक तेवढं व्हिटॅमिन डी मिळतं. मात्र, नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी २ ही वेळ सगळ्यात फायदेशीर असते. हाडांच्या समस्या असणाऱ्या लोकांसाठी दुपारी उन्हात बसणं सगळ्यात बेस्ट मानलं जातं.
उन्हात किती वेळ बसावं?
व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी उन्हात जास्तीत जास्त २० ते ३० मिनिटे इतकाच वेळ बसावं किंवा फिरावं. हार्ड स्कीन असलेल्या लोकांनी यापेक्षा जास्त वेळ उन्हात बसावं. ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ उन्हात बसू नये कारण याने त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात.
