Acidity Bloating Relief Tips: आजच्या काळात खराब जीवनशैली आणि अनहेल्दी आहारामुळे पचनासंबंधी समस्या खूपच वाढल्या आहेत. त्यामध्ये गॅस आणि ब्लोटिंग म्हणजेच पोट फुगणे ही सर्वात त्रासदायक समस्या मानली जाते. ज्यांचे पचन कमजोर असते, त्यांनी काहीही खाल्लं तरी त्यांचं पोट ताणून फुगतं आणि गॅसचा त्रास सुरू होतो. जरी गॅस आणि पोट फुगणे ही सामान्य समस्या मानली जात असली तरी जास्त काळ राहिली तर आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. सलीम जैदी यांच्या मते, गॅस आणि पोट फुगण्यापासून आराम मिळवण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय अतिशय उपयोगी ठरतात. दही, आले आणि पुदिना यांसारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करून गॅसपासून सहज सुटका मिळू शकते.
गॅस आणि पोटफुगीसाठी आयुर्वेदिक घरगुती उपाय
आले
आले पचनासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. त्यातील नैसर्गिक घटक पचन सुधारतात, गॅस कमी करतात आणि पोट फुगणे आटोक्यात ठेवतात. याचा वापर करण्यासाठी एका कप पाण्यात थोडे आल्याचे काप किंवा किसलेले आले टाका. 5–10 मिनिटे उकळा. हे पाणी गाळून थोडे थंड करून प्या. हवे असल्यास त्यात थोडं मध किंवा लिंबाचा रसही घालू शकता.
पुदिना
पुदिना पोटातील स्नायूंना आराम देतं आणि जमा झालेला गॅस बाहेर काढण्यास मदत करतं. गरम पाण्यात ताज्या पुदिन्याची पाने टाकून काही मिनिटे ठेवा. नंतर गाळून हे पाणी प्या. याने गॅसपासून लगेच आराम मिळण्यास मदत होते. तसेच पुदिन्याचा रस काढून तो पाण्यात मिसळूनही घेऊ शकता.
दही
दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स चांगले बॅक्टेरिया वाढवतात, पचन सुधारतात आणि गॅसची समस्या कमी करतात. जेवणानंतर एक वाटी ताजे, साधे दही खावे. किंवा ताकात थोडे भाजलेली जिरे पूड आणि काळे मीठ घालून पिणेही अतिशय फायदेशीर.
