प्रत्येक फळ हे अतिशय गुणकारी, आरोग्यदायी असते. पण तरीही बहुतांशवेळा आपण पहिले प्राधान्य अशा फळांना देतो जे खाण्यासाठी सोपे असतात. पटकन उचलून सहज तोंडात टाकता येतात. डाळिंबाच्या बाबतीत बऱ्याचदा असं होतं की ते सोलत बसण्याचा कंटाळा अनेकांना येतो. त्यामुळे मग ते डाळिंब खाणंच टाळतात. पण डाळिंबाचे छोटेशे लालचुटूक, गुलाबी दाणे म्हणजे जणू काही पोषणाचा खजिनाच आहेत. आयुर्वेदामध्ये तर डाळिंबाला अतिशय गुणकारी आणि औषधी फळ मानलं गेलं आहे.(benefits of eating pomegranate)
डाळिंबामधून व्हिटॅमिन C, K, B5 मुबलक प्रमाणात मिळते. त्याच्यामध्ये लोह व फायबरही चांगल्या प्रमाणात असते. डाळिंबामधील अँटिऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे हार्ट ॲटॅकचा धोका कमी होतो. डाळिंबामधून लोहसुद्धा भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे हिमोग्लोबिन वाढविण्यासाठीही ते खूप उपयुक्त ठरते. डाळिंबामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यासाठी डाळिंबाची मदत होते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी नियमितपणे डाळिंब खायला हवे.
डाळिंबामधून कमी कॅलरीज व उत्तम फायबर मिळत असल्याने पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहाते. काही संशोधनानुसार असेही लक्षात आले आहे की डाळिंबातील घटक कर्करोग पेशींची वाढ मंदावतात. डाळिंबाचा रस सकाळी उपाशी पोटी घेतल्याने ॲसिडीटीचा त्रासही कायमचा जातो. तसेच मुळव्याधीवरही डाळिंब खूप फायदेशीर ठरते. उन्हात फिरून डोके दुखत असेल, डोळे लाल होऊन जळजळ करत असतील, खूप खोकला किंवा ठसका येत असेल तर अशावेळीही डाळिंबाचे दाणे खा. लगेचच आराम मिळेल. डाळिंबाच्या रसामध्ये थोडी पुदिन्याची पानं घालून प्यायल्याने उन्हाचा त्रास होत नाही. म्हणूनच असे हे बहुगुणी डाळिंब सलाड, कोशिंबीर या माध्यमातून तरी रोज तुमच्या पोटात जायलाच हवे..
संपर्क: शितल मोगल (आहारतज्ञ आणि वर्कआऊट प्लॅनर)
8605243534