Join us

National Dengue Day 2025 : डेंग्युचे डास घरातच येऊ नयेत म्हणून ५ उपाय, डेंग्यूचा घातक आजार टाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 14:11 IST

National Dengue Day 2025: डेंग्यूबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवस पाळला जातो. दरवर्षी यासाठी एक खास थीम निवडली जाते.

National Dengue Day 2025: डास चावल्यामुळे वेगवेगळे गंभीर आजार होतात. त्यातीलच एक म्हणजे डेंग्यू. एडीज एजिप्टी नावाचा डास चावल्यानं डेंग्यू होतो. डास तसे तर रात्रीच्या झोपेचं खोबरं करतात आणि वैताग देतात. पण डेंग्यूचे डास तापाचं कारण ठरतात, ज्यामुळे व्यक्तीला अनेक दिवस बेडवर पडून रहावं लागतं. अशात डेंग्यूबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवस पाळला जातो. दरवर्षी यासाठी एक खास थीम निवडली जाते. यावर्षी डेंग्यूची थीम आहे "लवकर कारवाई करा डेंग्यू थांबवा : स्वच्छ वातावरण, निरोगी जीवन". डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी स्वत:चा डासांपासून बचाव करणं गरजेचं (Home Remedies For Mosquitoes) असतं. अशात काही घरगुती उपाय करून तुम्ही डासांना घरातून पळवून लावू शकता.

डास पळवण्याचे घरगुती उपाय

कापूर जाळा

कापूर जाळणं हा डासांना पळवून लावण्यासाठी एक फायदेशीर उपाय ठरतो. डास पळवण्यासाठी दोन प्रकारे कापूर जाळला जाऊ शकतो. पहिली पद्धत म्हणजे घरात 10 ते 20 मिनिटांसाठी कापूर जाळा. कापूर जाळत असताना घराची दारं-खिडक्या बंद कराव्या. यामुळे डास मरतात. दुसरी पद्धत म्हणजे पाण्यात कापूर 1 ते 2 दिवसांसाठी भिजवून ठवा. त्यानंतर हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घरात सगळीकडे स्प्रे करा. यानंही डास पळून जातील.

लवंग आणि लिंबू

लवंग आणि लिंबाच्या मदतीनं देखील तुम्ही घरातील डास पळवून लावू शकता. यासाठी लिंबू अर्ध कापा आणि त्यात चार ते पाच लवंग टोचून ठेवा. लिंबू आणि लवंगाच्या गंधानं घरात फिरणारे डास बाहेर पळून जातील. अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी-बॅक्टेरिअल तत्व असलेला हा उपाय खूप डासांना पळवून लावण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो.

कडूलिंबाचं तेल

कडूलिंबाच्या पानांसोबतच कडूलिंबाचं तेलही खूप फायदेशीर असतं. हे तेल घरातील डास पळवून लावण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. कडूलिंबाचं तेल घरात सगळीकडे स्प्रे बॉटलच्या माध्यमातून शिंपडा. यासाठी कडूलिंबाचं तेल पाण्यात मिक्स करा. यात तुम्ही खोबऱ्याचं तेल किंवा लॅव्हेंडर ऑइलही मिक्स करू शकता.

लसूण

लसूण हा डास पळवून लावण्यासाठी आणखी एक बेस्ट घरगुती उपाय ठरू शकतो. डास पळवून लावण्यासाठी लसणाच्या काही कळ्या बारीक करा. हा कुटलेला लसूण पाण्यात टाका आणि चांगला मिक्स करा. हे पाणी एक तास तसंच राहू द्या आणि डास पळवून लावण्यासाठी त्यांच्यावर हे पाणी शिंपडा. घरात तुम्हाला एकही जिवंत डास दिसणार नाही.

मच्छरदानी वापरा

डासांपासून बचाव करण्यासाठी आणखी एक सोपा उपाय म्हणजे मच्छरदानी. बेडच्या चारही बाजूनं मच्छरदानी लावा आणि त्यात झोपा. हा उपाय करून डास तुमच्या जवळही येणार नाही आणि डेंग्यूचा धोकाही टळेल.

टॅग्स : डेंग्यूहेल्थ टिप्सआरोग्य