Morning Headache Causes : दिवसाची सुरूवात जर चांगली झाली तर पूर्ण दिवसही चांगला जातो. कामात लक्ष लागतं आणि फ्रेश वाटतं. यात झोपेची फार महत्वाची भूमिका असते. पुरेशी झोप घेतली तर आळस दूर होऊन, फ्रेश वाटतं. पण अनेकदा रात्री ७ ते ८ तासांची झोप घेऊनही काही लोकांना सकाळी डोकं दुखण्याची समस्या जाणवते. झोपेतून उठताच डोकं जड वाटतं आणि दुखायला लागतं. बऱ्याचदा सामान्य बाब समजून या समस्येकडे दुर्लक्ष केलं जातं. पण जर ही समस्या नेहमीच होत असेल, हा शरीरातील एक संकेत असू शकतो. नेहमीच सकाळी डोकेदुखीची समस्या काही सामान्य बाब नाही. यामागे आपल्या सवयी, पाण्याची कमतरता, तणाव किंवा कधी कधी गंभीर आजार या गोष्टी असू शकतात. जर वेळीच नेमकं कारण ओळखलं तर वेळीच उपचार घेऊन डोकेदुखी दूर केली जाऊ शकते.
पुरेशी झोप घेऊनही सकाळी डोकं का दुखतं?
जास्त झोप
बऱ्याच लोकांचा असा समज असतो की, जास्त झोपणं आरोग्यासाठी चांगलं असतं. पण सत्य तर हे आहे की, प्रमाणापेक्षा जास्त झोप घेतल्याने डोकं दुखण्याची समस्या होऊ शकते. जास्त वेळ झोपल्याने मेंदूतील केमिकल असंतुलित होतात. खासकरून वीकेंडला जास्त वेळ झोपल्याने वीकेंड हेडॅक होऊ शकतो. यामुळे डोकं जड वाटतं, सुस्ती जाणवते आणि चिडचिडही वाढते.
शरीरात पाण्याची कमतरता
रात्री झोपताना आपण जास्त पाणी पित नाही. तसेच जर दिवसभर भरपूर पाणी प्यायलं नाही तर सकाळी शरीर आणि मेंदूत पाण्याची कमतरता होऊ शकते. जेव्हा शरीर डिहायड्रेट होतो, तेव्हा मेंदू हलका आंकुचन पावतो, ज्यामुळे नसांवर दबाव पडतो. अशात डोकं दुखू लागतं. जास्त त्रास तेव्हा होतो, तेव्हा रात्री मद्यसेवन केलं जातं.
स्लीप एप्निया
स्लीप एप्निया ही एक अशी समस्या आहे, ज्यात झोपेदरम्यान श्वास पुन्हा पुन्हा थांबतो. यामुळे मेंदूला पुरेसं ऑक्सीजन मिळू शकत नाही. अशा लोकांमध्ये घोरण्याची समस्या अधिक असते, सकाळी झोपेतून उठल्यावर त्यांचं डोकं दुखू लागतं आणि दिवसभर झोप येऊ लागते. ही एक गंभीर स्थिती होऊ शकते. ज्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.
रात्री दात खाणं
बरेच लोक झोपेत नकळतपणे दात खातात. यामुळे जबडा आणि कानाजवळ्या स्नायूंमध्ये तणाव येतो, ज्यामुळे सकाळी डोकं दुखू लागतं. सकाळी जबडा दुखू लागतो, कानही दुखतात.
जाड उशी आणि झोपण्याची पद्धत
जर फार जाड उशी घेत असाल, फार जास्त मऊ किंवा कडक असेल तर मान चुकीच्या स्थितीत जाते. यामुळे मान आणि डोक्याच्या स्नायूंवर दबाव पडतो. तसेच चुकीच्या पोजीशनमध्ये झोपणंही सकाळी डोकेदुखीचं कारण ठरू शकतं.
तणाव, चिंता
आपल्या मानसिक आरोग्याचा प्रभाव थेट आपली झोप आणि डोकेदुखीवर पडतो. ज्या लोकांना चिंता किंवा तणावाची समस्या असेल, त्यांच्यात सकाळी डोकेदुखीची समस्या अधिक बघायला मिळते. तणावामुळे गाढ झोप लागत नाही, ज्यामुळे शरीर पूर्णपणे आराम करू शकत नाही.
एकंदर तर काय छोट्या छोट्या सवयी बदलल्या, काही गोष्टींची काळजी घेतली तर सकाळी झोपेतून उठल्यावर डोकेदुखीची समस्या दूर होऊ शकते. दिवसभर भरपूर पाणी प्यावे, रात्री ७ ते ८ तासांची चांगली झोप घ्यावी. चिंता - तणावापासून दूर राहिलं पाहिजे.
