Heart Attack In Morning : हार्ट अॅटॅकच्या केसेस हल्ली खूप वाढल्यात हे रोज बघायला मिळतं. चिंतेची बाब ही आहे की, तरूणांना देखील हार्ट अॅटॅक येतोय. काही वर्षांआधीपर्यंत ही समस्या वृद्धांची समजली जात होती. हार्ट अॅटॅक येण्याची कारणं देखील हेल्थ एक्सपर्ट वेळोवेळी सांगत असतात. पण अलिकडे लोकांची लाइफस्टाईल आणि लोकांच्या सवयी इतक्या बदलल्या आहेत की, निरोगी राहण्यासाठी सगळेच नियम फॉलो करणं अवघड होतं. आपण पाहिलं असेल की, हार्ट अॅटॅकच्या घटना सकाळी जास्त घडतात. यामागे काही ठोस कारणंही आहेत. अनेक रिसर्चमधून हे समोर आलंय की, हार्ट अॅटॅक येणाचा धोका रात्रीच्या तुलनेत सकाळी तीन पटीने जास्त असतो. पण यामागचं कारण काय? तेच समजून घेऊया.
ब्लड प्रेशर आणि स्ट्रेस हार्मोनचं प्रमाण
मुळात जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं ब्लड प्रेशर कमी राहतं, पण आपण जाण्याच्या प्रक्रियेत असतो तेव्हा शरीर स्वत:ला अॅक्टिवेट करण्यासाठी कोर्टिसोल आणि एड्रनेनालिनसारखे स्ट्रेस हार्मोन सोडतं. याला मॉर्निंग सर्ज असं म्हणतात. या सर्जमुळे अचानक ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट वाढतो. ज्या लोकांच्या आर्टरीजमध्ये आधीच ब्लॉक आहे, त्यांच्यासाठी हा वाढलेला दबाव हार्ट अॅटॅकचं कारण बनतो.
क्लॉटिंगचा धोका
आधीच सकाळी आपलं रक्त जरा जास्त घट्ट होतं. जर धमण्यांमध्ये आधीच काही ब्लॉकेज असेल तर त्यामुळे रक्ताच्या गाठी तयार होण्याचा धोका जास्त राहतो. या रक्ताच्या गाठींमुळे ब्लड फ्लो रोखला जातो, ज्यामुळे हार्ट अॅटॅक येतो.
कमी पाणी
आपण जेव्हा ७ ते ८ तासांची झोप घेतो तेव्हा पाणी पित नाही. इतके तास पाणी न प्यायल्याने शरीराला हलकं डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशनमुळे रक्ताचा व्हॉल्यूम कमी होतो आणि ते आणखी जास्त घट्ट होतं. घट्ट रक्त पंप करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते, ज्यामुळे हृदयावर अधिक दबाव पडतो.
झोपेची समस्या
झोपेच्या गुणवत्तेचा आणि हृदयाचा थेट संबंध असतो. स्लीप अॅप्नीयासारख्या आजारात झोपेते श्वास पुन्हा पुन्हा अडखळतो, ज्यामुळे शरीरात ऑक्सीजनचं प्रमाण कमी होतं. यामुळे शरीरात सूज वाढते आणि सकाळी झोपेतून उठताच हृदयावर दबाव वाढतो. जर झोप पूर्ण झाली नाही तर हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा आणि डायबिटीसचा धोका अधिक वाढतो.
काय कराल उपाय?
सकाळी झोपेतून उठल्यावर एकदम झटक्याने उठू नका. लगेच कामाला लागू नका. झोपून उठल्यावर ५ मिनिटे शांत बसा आणि शरीराला हळूहळू अॅक्टिव होऊ द्या.
सकाळी झोपेतून उठताच एक ग्लास पाणी प्या, जेणेकरून रात्रभर झालेलं डिहायड्रेशन दूर होईल.
जर ब्लड प्रेशर किंवा डायबिटीसची औषधं घेत असाल, तर ती औषधं योग्य वेळेवर घ्या.
जर आपल्याला हृदयासंबंधी काही समस्या असेल तर सकाळी फार थंड वातावरणात जास्त जड वर्कआउट करणं टाळावं.
