आजकाल फोन आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. संवाद साधण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी, गेम खेळण्यासाठी, सोशल मीडिया वापरण्यासाठी फोन नेहमीच आपल्या हातात असतो. काही लोक फोनवर बराच वेळ बोलत राहतात. पण तुमची फोनवर खूप वेळ बोलण्याची सवय तुम्हाला महागात पडू शकते. ती कानांसाठी घातक आहे.
जर तुम्ही तासन्तास फोनवर बोलत असाल तर तुमची ऐकण्याची क्षमता ही हळूहळू कमी होऊ शकते. WHO ने आधीच इशारा दिला आहे की, १२ ते ३५ वर्षे वयोगटातील १०० कोटींहून अधिक लोकांना ऐकण्याची क्षमता कमी होण्याचा किंवा बहिरेपणाचा धोका असू शकतो. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे इअरबड्स आणि हेडफोन्सचा आवाज आहे.
जेव्हा आपण फोनवर बोलतो किंवा गाणी ऐकतो तेव्हा बहुतेक लोक इअरफोन किंवा हेडफोन वापरतात. जर आवाज खूप मोठा असेल किंवा त्याचा कालावधी खूप जास्त असेल तर तो तुमच्या कानातील नसांना नुकसान पोहोचवू शकतो, ज्यामुळे हळूहळू ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते.
फोनमधून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आपल्या कानांना आणि मेंदूलाही हानी पोहोचवू शकतात. जेव्हा आपण फोन थेट कानाजवळ ठेवून तासन्तास बोलत असतो, तेव्हा हे रेडिएशन आपल्या कानाच्या आतील संरचनेवर परिणाम करू शकतात.
वेळीच व्हा सावध
- हळू हळू कमी ऐकू येणं.
- कानात सतत आवाज येणं किंवा शिट्टी वाजल्यासारखं वाटणं.
- एका किंवा दोन्ही कानात वेदना किंवा जळजळ होणं.
- फोनवर बोलताना स्पष्ट ऐकू येत नाही.
- जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणं जाणवली तर ताबडतोब ईएनटी स्पेशालिस्टकडे जा.
अशी घ्या काळजी
- फोनवर बोलताना स्पीकर मोड किंवा एअरट्यूब हेडसेट वापरा.
- शक्य तितके कमीत कमी इअरफोन्स-हेडफोन्स किंवा इअरबड्स वापरा.
- ६० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लावू नका.
- फोनचा आवाज नेहमी ६०% पेक्षा कमी ठेवा.
- रात्री झोपताना फोन उशाजवळ ठेवू नका, बोलू नका किंवा गाणी ऐकू नका.
- दर ३०-४० मिनिटांनी फोन वापरल्यानंतर थोडा ब्रेक घ्या जेणेकरून तुमच्या कानांना थोडा आराम मिळेल.