भारतात बहुतांश लोक झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करतात किंवा फोन उशीजवळ ठेवूनच झोपतात. ही सवय आता सामान्य झाली आहे, पण याचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो? लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील एनेस्थीसियोलॉजिस्ट डॉ. मायरो फिगुरा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे यावर धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय आणि यामुळे खरंच कॅन्सर होतो का, ते जाणून घेऊया.
डॉ. फिगुरा यांच्या मते, झोपताना फोन डोक्याजवळ ठेवणं योग्य नाही. ते म्हणतात, "जर तुम्हाला फोन अगदी डोक्याजवळ ठेवून झोपण्याची सवय असेल, तर ती तातडीने बदलली पाहिजे. फोन वापरत नसतानाही त्यातून रेडिएशन बाहेर पडतात. यामुळे झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, डोकेदुखी होऊ शकते आणि दीर्घकाळात कॅन्सरचा धोकाही वाढू शकतो."
नॉन-आयोनाइजिंग रेडिएशन
रेडिएशनबद्दल स्पष्टीकरण देताना ते सांगतात की, मोबाईलमधून निघणारे विकिरण हे 'नॉन-आयोनाइजिंग रेडिएशन' असतं. हे सूर्याची किरणं, मेडिकल इमेजिंग किंवा'आयोनाइजिंग रेडिएशन' प्रमाणे थेट डीएनएला (DNA) नुकसान पोहोचवत नाही. तरीही ते रेडिएशनच्या श्रेणीत येतं. याच कारणामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याला "मानवांसाठी संभाव्य कार्सिनोजेनिक" (कॅन्सरजन्य) श्रेणीत ठेवलं आहे. विशेष म्हणजे कॉफी आणि लोणचं यांसारख्या गोष्टीही याच श्रेणीत येतात.
डॉ. फिगुरा असंही सांगतात की, हा धोका केवळ रेडिएशनपुरता मर्यादित नाही. अनेकदा चार्जिंग दरम्यान फोन जास्त गरम होतो, ज्यामुळे आग लागण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे झोपताना फोन जवळ ठेवणं सुरक्षित नाही. फोन बेडपासून दूर किंवा दुसऱ्या खोलीत ठेवणं उत्तम, जेणेकरून तुमची झोप सुधारेल आणि संभाव्य धोके कमी होतील.
इतर तज्ज्ञांचं मत
कोलकाता येथील अपोलो कॅन्सर सेंटरच्या रेडिएशन ऑन्कोलॉजी कन्सल्टंट डॉ. अरुंधती डे यांच्या मते, मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिओफ्रिक्वेन्सी लहरींमुळे ब्रेन ट्यूमर किंवा कॅन्सर होतो, याचा अद्याप कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा मिळालेला नाही. त्या स्पष्टपणे सांगतात की, "मोबाईलच्या रेडिओफ्रिक्वेन्सी लहरींमुळे कॅन्सर होतो हे अद्याप सिद्ध झालेलं नाही." जगभरात यावर मोठं संशोधन सुरू असलं तरी सध्याची आकडेवारी रेडिएशन आणि कॅन्सरचा थेट संबंध दर्शवत नाही.
तज्ज्ञांच्या मते, याचा सर्वात मोठा परिणाम झोपेवर होतो. स्मार्टफोनमधून सतत निघणारा प्रकाश, नोटिफिकेशन्स, अलर्ट्स आणि व्हायब्रेशनमुळे मेंदू सतत सतर्क राहतो. तुम्ही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही तरी मेंदू या संकेतांची नोंद घेत असतो, ज्यामुळे गाढ झोप लागत नाही.
