सध्याच्या काळात, प्रत्येकाच्या हातात असलेला स्मार्टफोन हा त्यांच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनला आहे. सकाळी डोळे उघडताच मोबाईल पाहणे आणि रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलवर सोशल मिडिया चाळणे ही फारच कॉमन गोष्ट झाली आहे. घरांतील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वचजण आजकाल दिवसभर मोबाईलमध्ये अगदी व्यस्त असतात. या सवयीला 'डूमस्क्रोलिंग' (Doomscrolling) असे म्हणतात, ज्यात लोक सतत नकारात्मक बातम्या, सोश मिडिया आणि नोटिफिकेशन्समध्ये गुंतलेले असतात. जेव्हा दिवसभर मोबाईल हातात असतो, तेव्हा तो पकडण्याची किंवा मोबाईलची स्क्रीन पाहण्याची पद्धत योग्य असणे महत्त्वाचे असते(Mobile Posture Cause Mental Problems).
जर मोबाईल पकडण्याची किंवा पाहण्याची पद्धत चुकीची असेल, तर त्यामुळे मानसिक आरोग्याचे सुद्धा नुकसान होऊ शकते याबद्दल अधिक जाणून घेऊयात. नवी दिल्ली येथील Royal House of Psychiatry & World Brain Center Hospital चे डायरेक्टर डॉ. नीलेश तिवारी यांनी एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल पकडण्याची किंवा पाहण्याची पद्धत चुकीची (mobile posture and mental health) असेल तर नेमकं काय होऊ शकत ते पाहूयात...
बॉडी पोश्चर आणि मूडचा नेमका संबंध काय असतो ?
डॉ. नीलेश म्हणतात, “खरंतर, शरीराची स्थिती आणि हालचाली आपल्या विचारांवर आणि भावनांवर परिणाम करतात. जे लोक खांदे झुकवून बसतात, ज्यांचं डोकं खाली असते आणि नजर फोनवर खिळलेली असते, अशा स्थितीत मेंदूला थकवा, उदासी आणि चिंतेचे संकेत मिळतात. सातत्याने अशा स्थितीत बसल्याने किंवा चालल्याने डिप्रेशन आणि एन्झायटी होण्याचा धोका वाढतो. याच्या अगदी उलट, जे लोक सरळ बसतात, ज्यांचे खांदे मोकळे असतात अशा लोकांमध्ये अधिक आत्मविश्वास, ऊर्जा आणि आनंद भरपूर प्रमाणत दिसून येतो.
चुकीच्या बॉडी पोश्चरमध्ये बसून मोबाईल पाहिल्याने नैराश्य येऊ शकते का?
डॉ. नीलेश म्हणतात, “तसे पाहिले तर थेट परिणाम होत नाही, पण चुकीच्या पद्धतीने मोबाईल हातात धरणे किंवा स्क्रीन पहाणे हे नैराश्य येण्याचे करणं ठरु शकते. फक्त चुकीच्या बॉडी पोश्चरमुळे डिप्रेशन किंवा एन्झायटी येत नाही, परंतु ही सवय तुमच्या सध्याच्या मानसिक स्थितीला अधिक बिघडवू शकते. जर एखादी व्यक्ती आधीपासूनच लो मूड किंवा स्ट्रेसमध्ये असेल, तर झुकलेलं बॉडी पोश्चर त्यांच्या या नकारात्मक भावनांना आणखी मजबूत करू शकते. याला तुम्ही फीडबॅक लूप म्हणू शकता. ही शारीरिक स्थिती प्रथम मेंदू व शरीरावर वाईट परिणाम करते.
आत्तापर्यंत तुम्ही चुकीच्या पद्धतीने खात आहात पालेभाज्या! भरपूर पोषण हवं तर ‘अशी’ खा पालेभाजी...
कोणत्या कुशीवर झोपल्याने लागते चटकन झोप? शांत व गाढ झोप येण्यासाठी करा ५ गोष्टी...
चुकीच्या बॉडी पोश्चरचा शरीरावर कसा परिणाम होतो?
डॉ. नीलेश यांनी सांगितले की, चुकीच्या बॉडी पोश्चरचा शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो.
१. श्वासोच्छ्वास प्रक्रियेवर परिणाम :- झुकलेल्या शरीरामुळे फुफ्फुसे (Lungs) पूर्णपणे मोकळेपणाने श्वास घेऊ शकत नाहीत, ज्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. यामुळे थकवा आणि स्ट्रेस दोन्ही वाढतात.
२. रक्ताभिसरण कमी होणे :- रक्तप्रवाह कमी झाल्याने शरीर आणि मन सुस्तावते किंवा आळस येतो.
३. हार्मोनल बदल :- सतत झुकलेल्या स्थितीत राहिल्याने स्ट्रेस हार्मोन म्हणजेच कॉर्टिसोल वाढतो, ज्यामुळे एन्झायटी आणि चिडचिडेपणा वाढू शकतो.
केसांना हेअर डाय लावून विकत घेताय कॅन्सरचं दुखणं! १ चूक पडेल महागात - वेळीच व्हा सावध...
मानसिक आरोग्य (Mental Health) चांगले ठेवण्यासाठी टिप्स :-
डॉ. नीलेश यांनी मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी योग्य बॉडी पोश्चर आणि लाईफस्टाईल छोटे बदल करण्याच्या काही टिप्स दिल्या आहेत.
१. मानेला खाली झुकवण्याऐवजी, फोन डोळ्यांच्या पातळीवर थोडासा उंचीवर ठेवा.
२. एक टायमर लावा आणि दर अर्ध्या तासाने उठा व थोडे स्ट्रेचिंग करा.
३. दिवसातून अनेक वेळा आपण कोणत्या बॉडी पोश्चरमध्ये बसतो हे ते तपासावं.
४. मान आणि खांद्यांचे व्यायाम करून त्यांना मजबूत करा.
डॉ. नीलेश म्हणतात की, सरळ व्यवस्थित बॉडी पोश्चर मध्ये बसणे तुमच्या मेंदूला सकारात्मक असल्याचा संकेत पाठवते आणि चुकीचे बॉडी पोश्चर जरी थेटपणे एन्झायटी किंवा डिप्रेशनचे कारण नसले, तरी ते मानसिक आणि शारीरिक अशा दोन्हीचा समतोल बिघडवू शकते. फक्त फोन वापरण्याची पद्धत बदलून आणि दर काही मिनिटांनी आपले बॉडी पोश्चर सुधारून तुम्ही स्वतःला अधिक चांगले आणि उत्साही असल्याचे अनुभवू शकता.
