Join us

लग्न झालेल्या लोकांना विसरण्याचा आजाराचा जास्त धोका? 'ही' आहेत डिमेंशियाची लक्षणं अन् कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:05 IST

विवाहित लोकांना अविवाहित लोकांपेक्षा डिमेंशिया म्हणजेच विसरण्याचा आजार होण्याचा धोका जास्त असतो.

विवाहित लोकांना अविवाहित लोकांपेक्षा डिमेंशिया म्हणजेच विसरण्याचा आजार होण्याचा धोका जास्त असतो. अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या रिसर्चमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे. या रिसर्चने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे, कारण आतापर्यंत आपण ऐकत आलो आहोत की विवाहित लोक अविवाहित लोकांपेक्षा जास्त आनंदी असतात कारण त्यांच्याकडे जोडीदार असतो, त्यांना एकटेपणा जाणवत नाही, त्यांची जीवनशैली चांगली असते आणि त्यांचे आरोग्य देखील तंदुरुस्त राहते, परंतु या रिसर्चमध्ये सर्वकाही उलट असल्याचं आढळून आलं आहे.

डिमेंशिया म्हणजे काय?

डिमेंशिया हा मेंदूचा एक आजार आहे ज्यामध्ये व्यक्ती गोष्टी लक्षात ठेवण्यास विसरतो. बहुतेकदा हे वृद्धांमध्ये, म्हणजेच ६० वर्षांनंतर दिसून येतं. हा आजार हळूहळू विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता नष्ट करतो. यामध्ये अल्झायमर, व्हॅस्क्युलर डिमेंशिया, पार्किन्सनसारखे अनेक मानसिक आजार समाविष्ट आहेत. आकडेवारीनुसार, भारतात सुमारे ४० लाख डिमेंशियाचे रुग्ण आहेत, तर जगभरात ५.५ कोटींहून अधिक लोक या आजाराने ग्रस्त आहेत.

डिमेंशियाची लक्षणं

- घरचा रस्ता विसरणं.

- ठेवलेल्या गोष्टी विसरणं.

- योग्य निर्णय घेण्यास असमर्थ.

- नेहमी गोंधळलेलं असणं.

- दैनंदिन कामं करण्यास असमर्थ.

- एका वेळी एकच काम करू शकणं.

- मूड बदलतो

डिमेंशियाची कारणं काय आहेत?

 - ब्रेन स्ट्रोक किंवा दुखापत

- व्हिटॅमिनची कमतरता

- ब्रेन ट्यूमर

- थायरॉईडची समस्या

- वय जास्त असणं

- व्यसन

रिसर्चमध्ये नेमकं काय म्हटलं? 

फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या रिसर्चमध्ये २४,००० हून अधिक अमेरिकन लोकांचा समावेश होता. त्या सर्वांना ४ वेगवेगळ्या गटात ठेवण्यात आलं होतं. विवाहित, अविवाहित, घटस्फोटित आणि विधवा किंवा विधुर. त्यांच्या आरोग्यावर १८ वर्षे लक्ष ठेवण्यात आलं. त्याचा रिझल्ट धक्कादायक असल्याचं आढळून आलं. यानुसार, जे लोक सिंगल होते म्हणजेच घटस्फोटित, विधवा आणि विधुरांमध्ये डिमेंशियाचा धोका विवाहित लोकांपेक्षा ५०% कमी होता.

विवाहित लोकांना डिमेंशियाचा धोका जास्त 

लग्नानंतर बहुतेक लोक त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित राहतात, त्यांचा बाहेरील जगाशी असलेला संबंध कमी होतो, त्यांच्या सोशल एक्टिव्हिटी कमी होतात, ज्याचा त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो. बऱ्याचदा नात्यातील ताण मानसिक आरोग्य देखील बिघडवतो. जबाबदाऱ्या जास्त असतात, ज्यामुळे मेंदूवरील भार वाढतो. एकटे लोक अधिक सामाजिक असतात, ते फिरतात, पार्टी करतात, तणावमुक्त असतात आणि हे सर्व त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवतं.

डिमेंशिया कसा करायचा बचाव?

- दररोज व्यायाम आणि योगासने करा.

- सकस आहार घ्या.

- तुमचं वजन नियंत्रणात ठेवा.

- दारू आणि सिगारेटपासून दूर राहा.

- सोशल राहा आणि एक्टिव्ह आयुष्य जगा.

- ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवा.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स