मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपण्यापूर्वीच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपली नजर स्क्रीनवरच खिळलेली असते. परंतु, हीच सवय आता आपल्या स्मरणशक्तीसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. जगातील अनेक देशांमध्ये कमकुवत होणारी स्मरणशक्ती ही एक मोठी समस्या बनली आहे. जपानमधून समोर आलेली आकडेवारी धडकी भरवणारी आहे. केवळ वृद्धच नव्हे, तर तरुण आणि मुलं देखील विसराळूपणाचे बळी ठरत आहेत. तज्ज्ञ याला डिजिटल युगाचा ‘सायलेंट किलर’ म्हणत आहेत, जो कोणताही गाजावाजा न करता हळूहळू मेंदू कमकुवत करत आहे.
जपानमध्ये २०२४ या वर्षात स्मृतीभ्रंश म्हणजेच स्मरणशक्ती गमावण्याची समस्या अत्यंत भीषण स्वरूपात समोर आली आहे. आकडेवारीनुसार, सुमारे १८ हजार वृद्ध स्वतःच्या घराचा रस्ता विसरले. स्मरणशक्ती कमकुवत झाल्यामुळे या वृद्धांचं भरकटणं ही संपूर्ण समाजासाठी धोक्याची सूचना बनली आहे. सर्वात वेदनादायक बाब म्हणजे भरकटलेल्या या वृद्धांपैकी सुमारे ५०० जणांचे मृतदेह बेवारस अवस्थेत आढळले. स्मृतीभ्रंश आता केवळ एक आजार नसून जीवघेणं संकट बनत चाललं आहे.
स्मृतीभ्रंशमुळे डिमेंशियाचा धोका
स्मृतीभ्रंश म्हणजे केवळ गोष्टी विसरणं इतपतच मर्यादित नाही. अनेक प्रकरणांमध्ये याचे रूपांतर पुढे 'डिमेंशिया'मध्ये होतं. डिमेंशियामध्ये स्मरणशक्तीसोबतच बोलणं, विचार करणं आणि निर्णय घेण्याची क्षमताही कमकुवत होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, सध्या जगात ३.५ कोटींहून अधिक लोक डिमेंशियाने ग्रस्त आहेत. असा अंदाज आहे की २०५० पर्यंत ही संख्या ११.५ कोटींपर्यंत पोहोचू शकते. ही परिस्थिती स्पष्ट करते की कमकुवत होणारी स्मरणशक्ती हे आता जागतिक आरोग्य संकट बनले आहे.
डिजिटल लाईफस्टाईलमुळे मेंदू होतोय कमकुवत
वाढता 'स्क्रीन टाईम' मेंदूच्या कार्यपद्धतीत बदल करत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. सोशल मीडिया, व्हिडीओ आणि सतत मिळणारी माहिती यामुळे मेंदू थकत चालला आहे. यातून राग, चिडचिडेपणा, निद्रानाश आणि एकटेपणा वाढत आहे. स्क्रीनवर सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध असल्याने, गोष्टी विचार करून लक्षात ठेवण्याची गरज कमी होत चालली आहे. सामाजिक, शारीरिक आणि मानसिक हालचालींच्या कमतरतेमुळे मेंदू कमकुवत होत आहे. भारतात झालेल्या एका सर्वेक्षणातही लोकांची स्मरणशक्ती कमकुवत होत असल्याचं समोर आलं असून यामध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे.
सतर्क राहा
तज्ज्ञांच्या मते, तंत्रज्ञानापासून पूर्णपणे दूर जाणं शक्य नसलं तरी त्यात संतुलन राखणं हे अत्यंत गरजेचं आहे. मेंदू सक्रिय ठेवण्यासाठी गोष्टी लक्षात ठेवण्याची सवय लावणं, सामाजिक संवाद वाढवणं, शारीरिक हालचाली आणि मानसिक व्यायाम करणं आवश्यक आहे. सरकारलाही डिमेंशियासारख्या आजारांशी लढण्यासाठी ठोस धोरणं आखावी लागतील. सतर्क राहणं हाच या ‘सायलेंट किलर’पासून बचाव करण्याचा सर्वात मोठा उपाय आहे.
