Join us
Daily Top 2 Weekly Top 5

पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 21:09 IST

रात्रीच्या वेळी या स्क्रीन्सचा जास्त वापर केल्याने तुमच्या झोपेवर आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

स्मार्टफोन हा आता सर्वांच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, आपल्यापैकी बहुतेक जण सतत फोनचा वापर करत असतात. स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही आणि टॅब्लेटच्या स्क्रिनकडे पाहत असतात. पण तुम्हाला माहित आहे का की, रात्रीच्या वेळी या स्क्रीन्सचा जास्त वापर केल्याने तुमच्या झोपेवर आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. खरं तर, जास्त स्क्रीन टाइम शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणारा मेलाटोनिन हार्मोन कमी करतो. त्यामुळे आरोग्याचं काय नुकसान होतं हे जाणून घेऊया.

मेलाटोनिन म्हणजे काय?

मेलाटोनिन हा एक प्रकारचा हार्मोन आहे जो आपल्या झोपेच्या आणि जागे राहण्याची सायकल कंट्रोल करतो. अंधार पडताच, मेलाटोनिन तयार होऊ लागतो आणि आपले शरीर विश्रांतीसाठी तयार होऊ लागते. एका रिसर्चनुसार, मेलाटोनिन केवळ झोप येण्यास मदत करत नाही तर ते एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट देखील आहे जे रोगप्रतिकारक शक्ती, ब्लड प्रेशर आणि मूड देखील कंट्रोल करतं.

स्क्रीन टाईमचा मेलाटोनिनवर परिणाम

मेलाटोनिनचा थेट संबंध प्रकाशाशी आहे, विशेषतः निळ्या रंगाच्या प्रकाशाशी. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या (२०१४) अभ्यासानुसार, रात्री फक्त १.५ तास स्क्रीन एक्सपोजरमुळे मेलाटोनिनचे प्रमाण ५०% कमी होऊ शकतं.

मेलाटोनिनच्या कमतरतेची लक्षणं

- रात्री झोप न लागणे.

- झोपेचा कालावधी कमी होणे.

- वारंवार झोपेत अडथळा

- दिवसभराचा थकवा आणि एकाग्रतेचा अभाव

- कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती

- मूड स्विंग्स

सर्वात जास्त धोका कोणाला?

लहान मुलं आणि तरुणांना सर्वाधिक धोका असतो कारण त्यांचा स्क्रीन टाईम जास्त असतो आणि त्यांचे डोळे निळ्या प्रकाशासाठी अधिक संवेदनशील असतात. २०२१ च्या एका अभ्यासात असं आढळून आलं की, जी मुलं दिवसातून ४ तासांपेक्षा जास्त वेळ स्क्रीन वापरतात त्यांच्यामध्ये मेलाटोनिनची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते आणि झोपही कमी होते.

मेलाटोनिन कसं वाचवायचं?

नाईट मोड किंवा ब्लू लाईट फिल्टर वापरा. यामुळे रात्रीच्या वेळी तुमच्या डोळ्यांना इजा होण्यापासून वाचवू शकते. झोपण्यापूर्वी कमीत कमी एक तास आधी स्क्रीनपासून दूर राहा. ब्लू लाइट ब्लॉकिंगचा चष्मा वापरा. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यस्मार्टफोन