Join us

'लंग्स फायब्रोसिस' म्हणजे काय? जाणून घ्या, कसा होतो हा आजार, कशी घ्यायची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 19:16 IST

इडिओपेथिक लंग्स फायब्रोसिस म्हणजे इडिओपेयिक या शब्दाचा अर्थ त्याचे कारण माहीत नसणे, तर लंग्स फायब्रोसिस म्हणजे हा फुफ्फुसाचा एक गंभीर आजार असून, तो श्वसनप्रणालीवर परिणाम करतो.

सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे इडिओपेयिक लंग्स फायब्रोसिस या आजाराने निधन झाले. त्यानंतर या आजाराबद्दल अनेकांनी माहिती घेण्यास सुरुवात केली. कुणी समाजमाध्यम, तर कुणी गुगलवरून याची माहिती काढली. मात्र, हा आजार होऊ नये यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. 

इडिओपेथिक लंग्स फायब्रोसिस म्हणजे इडिओपेयिक या शब्दाचा अर्थ त्याचे कारण माहीत नसणे, तर लंग्स फायब्रोसिस म्हणजे हा फुफ्फुसाचा एक गंभीर आजार असून, तो श्वसनप्रणालीवर परिणाम करतो. हा आजर असलेल्या रुग्णास चालताना मोठ्या प्रमाणात दम लागतो, तसेच त्याला काही वेळेस कृत्रिमरीत्या ऑक्सिजन देण्याची वेळ येते. त्यामुळे याचा परिणाम दैनंदिन कामावर होत असतो.

धूळ आणि प्रदूषण 

गेल्या काही महिन्यांत मुंबईसह अनेक जिल्ह्यांतील हवेची गुणवत्ता पातळी घसरली आहे, प्रदूषण आणि धुळीचे प्रमाण वाढल्याने श्वसनविकाराच्या व्याधींमध्ये वाढ झाली आहे. अनेक नागरिकांना वारंवार खोकल्याचा त्रास होत आहे. औषधे घेतल्यानंतरसुद्धा हा त्रास कमी होत नाही. मोठ्या प्रमाणात रस्ते, इमारतीची बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे हवेत धूळ दिसून येते. हीच श्वास घेण्याच्या प्रक्रियेतून फुफ्फुसात जाते. यामुळे फुफ्फुसाला गंभीर इजा होण्याची शक्यता असते.

कबुतरांमुळे होतो 'हा' त्रास 

- कबुतरांना अनेकदा खायला देऊ नये. कबुतरखाने बंद करा, याबाबत नागरिक मागणी करतात. जेथे हे कबुतरखाने आहेत, त्या ठिकाणच्या नागरिकांना श्वसनविकाराचा आजार होतो. 

- कबुतरांच्या विष्ठेतून झालेल्या संसर्गामुळे श्वसनविकार वाढतो. कारण कबुतरांच्या विष्ठेत बुरशी, जिवाणू असतात. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना हा फुफ्फुसाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. 

- या संसर्गामुळे फुफ्फुसाचा त्रास बळावतो, त्याचे रूपांतर लंग्स फायब्रोसिसमध्ये होण्याची शक्यता असते. त्यामुळे या आजारावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.

काय करू नये? 

- धूम्रपान करू नये. - धुळीच्या ठिकाणी मास्क घालावा - हा आजार अनुवंशिक आहे. 

काय करावे? 

- संतुलित आहार घ्यावा.  - नियमित व्यायाम करावा.  - रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवा.

... तर गुंतागुंत होऊ शकते 

फुफ्फुस फायब्रोसिसमुळे रुग्णाला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होतो. काम करताना उत्साह राहत नाही. या आजारावर औषधे आहेत. मात्र, एकदा का हा आजार झाला की, रुग्णाला दीर्घकालीन औषधे घ्यावी लागतात. आजार होऊ नये यासाठी जीवनशैली उत्तम ठेवणे, तसेच श्वसनाचा काही विकार झाल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. श्वसनविकारावर वेळीच उपचार केला नाही, तर गुंतागुंत होऊ शकते.

-  डॉ. जलील पारकर, श्वासनविकारतज्ज्ञ, लीलावती रुग्णालय  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य