आपल्याकडे जुन्या काळापासून काही गोष्टी चालत आलेल्या आहेत.. त्यापैकी एक म्हणजे तांब्याच्या भांड्यातले पाणी पिणे. अनेक जण दिवसाची सुरुवात तांब्याच्या भांड्यातले पाणी पिऊन करतात. कारण इतर कोणत्याही धातूमधल्या किंवा मातीच्या भांड्यापेक्षा तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी अधिक लाभदायक असते, असं आपण ऐकत आलो आहोत. तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचनक्रिया अधिक चांगली होण्यास मदत होते, शिवाय त्यातून भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्सही मिळतात. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नसतो, तसंच ते तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याविषयीही आहे (avoid 3 mistakes while drinking copper pot water). म्हणूनच त्याचे आरोग्याला फायदेच व्हावेत यासाठी तांब्याच्या भांड्यातलं पाणी किती प्रमाणात प्यावं आणि कोणत्या चुका टाळाव्या याविषयीची ही माहिती...(Luke Coutinho told health benefits and disadvantages of drinking copper pot water)
तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
१. लाईफ स्टाईल कोच ल्यूक कोटीन्हो यांनी याविषयीची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ते म्हणतात की दिवसातून एक ते दोन ग्लास एवढंच तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायलं पाहिजे. हल्ली आपण असे कित्येक लोक बघतो ज्यांच्याकडे तांब्याची एक बाटली असते किंवा घरी तांब्याचे मोठे भांडे भरून ठेवलेले असते आणि ते लाेक दिवसभर त्याच भांड्यातले पाणी पितात. पण हे चूक आहे. त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे एक- दोन ग्लासपेक्षा जास्त तांब्याच्या भांड्यातले पाणी पिणे टाळावे.
२. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांब्याच्या भांड्यातले पाणी गरम करून अजिबात पिऊ नये. अनेक जण रात्री झोपताना तांब्याचे भांडे भरून ठेवतात. दुसऱ्यादिवशी ते पाणी थोडे कोमट करतात आणि मग ते पितात. असं करणं टाळावं. कारण पाणी गरम केल्याने त्यातले काही कम्पाउंड बदलतात. त्यामुळे त्या पाण्याचं तापमान नैसर्गिकपणे जसं असेल तसंच ते प्यावं.
३. तांब्याच्या भांड्यातल्या पाण्यामध्ये लिंबू, मध असे कोणतेही पदार्थ घालून ते पिऊ नये. यामुळे मळमळ, उलट्या, अपचन, गॅसेस असा त्रास होऊ शकतो..