लांब, आकर्षक नखं दिसायला फारच सुंदर असतात. हल्ली नेल आर्टची देखील भलतीच क्रेझ पाहायला मिळते. नखांवर नाजूक नक्षीकाम केलं जातं, यामुळे ते सर्वांचं लक्ष वेधून घेतात. पण नखं कितीही सुंदर आणि फॅशनेबल वाटत असली तरी ती आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, लांब नखांमध्ये फेकल बॅक्टेरिया जमा होऊ शकतात. फेकल बॅक्टेरिया म्हणजे मानव आणि प्राण्यांच्या विष्ठेमध्ये आढळणारे सूक्ष्मजंतू. हे जेवणादरम्यान सहजपणे अन्नात मिसळून गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकतात.
'अमेरिकन जर्नल ऑफ इन्फेक्शन कंट्रोल' नुसार, ई. कोलाय आणि सॅल्मोनेलासारखे सूक्ष्मजीव लांब नखांखाली जमा होतात. विशेषतः, नखांचा हा भाग व्यवस्थित आणि पूर्णपणे स्वच्छ करणं कठीण असल्यामुळे हात धुतल्यानंतरही बॅक्टेरिया तसेच राहू शकतात. जेव्हा लोक हाताने जेवतात तेव्हा नखांखाली लपलेले हे हानिकारक फेकल बॅक्टेरिया अन्नामार्फत थेट पोटात जातात. यामुळे जठरासंबंधी इन्फेक्शन किंवा अन्य आजार होण्याची शक्यता जास्त असते.
३२ प्रकारचे बॅक्टेरिया आणि २८ प्रकारच्या फंगस
एका रिसर्चमधून याआधी देखील अशीच धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. नखांच्या खाली ३२ वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आणि २८ प्रकारच्या फंगस आढळतात. २०२१ मध्ये हा रिसर्च करण्यात आला होता आणि अमेरिकन पोडियाट्रिक मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला होता.
रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे की, नखांच्या खाली आढळणारे बॅक्टेरिया आणि फंगस बहुतेक प्रकरणांमध्ये निरुपद्रवी असतात, परंतु कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये किंवा ज्यांच्या नखांना दुखापत झाली आहे किंवा इन्फेक्शन झालं आहे अशा लोकांमध्ये ते गंभीर समस्या निर्माण करू शकतात. कधी कधी हे जीवघेणं देखील ठरू शकतं. सुंदर नखांची हौस महागात पडू शकते.
नखांकडे द्या नीट लक्ष
बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनची लक्षणं म्हणजे नखांचा रंग बदलणं, सूज येणं, वेदना होणं आणि पू तयार होणे. म्हणून नखांची काळजी आणि स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असते. हा धोका टाळण्यासाठी, वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नखं जास्त वाढवू नका. वेळच्या वेळी नखं आठवणीने कापा. जेवणाआधी आणि नंतर हात स्वच्छ धुवा. हे साधे उपाय बॅक्टेरियाचा प्रसार रोखण्यासाठी खूप प्रभावी आहेत.
