Join us

चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 16:20 IST

जागतिक आरोग्य संघटनेने फक्त कोरोनाच नाही तर अनेक आजारांमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं म्हटलं आहे.

संपूर्ण जगाला कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराचा सामना करावा लागला. यामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला. जागतिक आरोग्य संघटनेने फक्त कोरोनाच नाही तर अनेक आजारांमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. अशीच एक समस्या म्हणजे एकटेपणा, ज्याबद्दल आरोग्य तज्ज्ञांनी आता अलर्ट केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) रिपोर्टमध्ये असं दिसून आलं आहे की, जगातील प्रत्येक सहावा व्यक्ती एकटेपणाचा बळी ठरला आहे, ही परिस्थिती सायलेंट महामारीचं रूप धारण करत आहे.

एकटेपणाचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. इतकंच नाही तर दर तासाला तब्बल शंभर लोकांचा मृत्यू होत आहे. WHO ने एकटेपणाला एक गंभीर जागतिक आरोग्य धोका घोषित केला आहे. तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, एकटेपणाची समस्या नवीन नसली तरी ती आता आरोग्यासाठी  चिंतेचा विषय आहे. कोरोनात आर्थिक आणि सामाजिक क्रियांमध्ये झालेली घट आणि अनेक प्रकारच्या नकारात्मक परिस्थितींमुळे धोका अनेक पटींनी वाढला. 

 

२०२३ मध्ये, WHO ने एकाकीपणाच्या वाढत्या समस्येवर एक आंतरराष्ट्रीय आयोग देखील स्थापन केला. असं आढळून आले की, वृद्धांमध्ये एकाकीपणामुळे डिमेंशियासारखी गंभीर समस्या विकसित होण्याचा धोका ५०% वाढतो तर कोरोनरी आर्टरी रोग किंवा स्ट्रोकचा धोका ३०% वाढतो. याचा परिणाम तरुणांच्या जीवनावरही होत आहे. आकडेवारीनुसार, ५% ते १५% किशोरवयीन मुलांमध्ये एकटेपणा जाणवतो. आफ्रिकेत ही संख्या १२.७% आहे, तर युरोपमध्ये ती ५.३% आहे.

दर तासाला शंभराहून अधिक लोकांचा मृत्यू

आजच्या युगात, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधणं पूर्वीपेक्षा सोपं झालं आहे. मोबाईल, व्हिडीओ कॉल, ऑनलाईन मेसेज आणि व्हर्च्युअल मीटिंग आता सामान्य झाली आहे, परंतु हे सर्व असूनही, एकाकीपणाची वाढती भावना खूपच चिंताजनक आहे. एकटेपणा हा केवळ मानसिक त्रास नाही, तर दरवर्षी आठ लाख सत्तर हजारांहून अधिक लोकांचा जीव घेत आहेत, म्हणजेच दर तासाला शंभराहून अधिक लोकांचा यामुळे मृत्यू होत आहे.

 

मानसिक आरोग्यावर परिणाम

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सोशल कनेक्शन कमिशनच्या अहवालात या संकटावर प्रकाश टाकण्यात आला आहे. अहवालाचे सह-अध्यक्ष डॉ. विवेक मूर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, या एकाकीपणाचा केवळ लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत नाही तर शिक्षण, रोजगार आणि अर्थव्यवस्थेवरही खोलवर परिणाम होत आहे.

जास्त मोबाईलचा वापर, स्क्रीन टाइम आणि नकारात्मक ऑनलाईन वर्तन विशेषतः तरुणांमध्ये, मानसिक ताणतणाव आणखी वाढवत आहेत. सामाजिक सहभागामुळे आयुष्य अधिक मोठं, निरोगी आणि आनंदी होतं. तर एकटेपणामुळे स्ट्रोक, हृदयरोग, मधुमेह, स्मृतीभ्रंश आणि अकाली मृत्यूचा धोका जास्त वाढतो.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स