हिवाळा आपल्यासोबत अनेक आजार घेऊन येतो. हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे व्यक्ती वारंवार आजारी पडू लागते. हिवाळ्याच्या काळात लोकांना अपचन, गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या पचनाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावं लागतं. खरंतर, हिवाळ्यात शरीरातील मेटाबॉलिज्म मंदावतं, ज्यामुळे अन्न पचवण्यात समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत, लाईफस्टाईलमध्ये काही बदल केल्याने आपल्या आतड्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो, ज्यामुळे पचनशक्ती वाढवता येते.
हिवाळ्यात पचनशक्ती वाढवण्यासाठी करा 'हे' बदल
ताजं आणि गरम अन्न खा
हिवाळ्यात ताजं आणि गरम अन्न शरीराला आराम देण्यास आणि पचन करण्यास मदत करतं. सकस आहार शरीरासाठी फायदेशीर ठरतो. तसेच हिवाळ्यात जड आणि चरबीयुक्त पदार्थ खाणं टाळणं उचित आहे कारण त्यामुळे पचनसंस्थेवर दबाव येऊ शकतो.
पाणी आणि हायड्रेशनकडे लक्ष द्या
हिवाळ्यात लोक कमी पाणी पितात, ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवतात. पचनासाठी हायड्रेटेड राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोमट पाणी, तुळस किंवा पुदिन्याचा चहा सारखा हर्बल चहा प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.
हलकं अन्न खा आणि वेळेवर खा
हिवाळ्यात जड आणि तळलेले पदार्थ टाळा कारण ते पचण्यास कठीण असू शकतात. म्हणून, तुमच्या आहारात सूप, खिचडी, उकडलेलं अन्न यासारखं हलकं अन्न समाविष्ट करा. चांगल्या पचनासाठी वेळेवर अन्न खाणं देखील महत्त्वाचं आहे. झोपण्यापूर्वी जड जेवण केल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
व्यायाम आणि योगा करा
थंड हवामानात शरीरातील मेटाबॉलिज्म प्रक्रिया मंदावते. म्हणून योगा, चालणे इत्यादी हलके व्यायाम पचन सुधारण्यास मदत करतात. योगासनं पचनशक्ती वाढवण्यास मदत करतात.
ताण कमी करा
हिवाळ्यात मानसिक ताण पचनावरही परिणाम करू शकतो. ताण कमी करण्यासाठी, ध्यान आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम करा. हे केवळ मानसिक शांतीच देत नाही तर पचनक्रिया देखील सुधारतात.