Join us

पावसाळ्यात मुंबईत किडनी स्टोनच्या रूग्णांमध्ये वाढ; डॉक्टरांनी सांगितली कारणं, लक्षणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 16:58 IST

Kidney Stone Cases Increase : तशी ही समस्या काही नवीन नाही. आधी मध्यम वयाच्या लोकांना ही समस्या अधिक व्हायची. पण आता तर अलिकडे तरूण आणि महिलांमध्येही खूप वाढली आहे. 

Kidney Stone Cases Increase :  पावसाऴा सुरू झाली की, वेगवेगळे आजार डोकं वर काढतात. खासकरून मुंबईसारख्या महानगरात (Mubai) तर पाणी साचल्यामुळे आणि लोकसंख्या जास्त असल्यामुळे आजारांचं पसरणं खूप वाढतं. सर्दी, खोकला, ताप, मलेरिया, डायरिया, डेंग्यू हे आजार तर कॉमन आहेत. पण सोबतच या दिवसात किडनी स्टोनची (Kidney Stone) समस्या वाढल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तशी ही समस्या काही नवीन नाही. आधी मध्यम वयाच्या लोकांना ही समस्या अधिक व्हायची. पण आता तर अलिकडे तरूण आणि महिलांमध्येही खूप वाढली आहे. 

अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलच्या यूरोलॉजिस्ट डॉ. नसरीन गीते यांनी midday.com ला सांगितलं की, "किडनी स्टोन हे कॅल्शिअम आणि ऑक्सालेट यांच्या मिश्रणाने तयार होतात. वाढलेलं यूरिक अ‍ॅसिडही याला जबाबदार असतं. आजकाल तरूण आणि महिलांमध्ये याच्या केसेस वाढत आहेत. कारण नोकरीनिमित्ताने जास्तीत जास्त लोक बाहेर राहतात आणि पाणी कमी पितात. पाणी कमी प्यायल्यानं डिहायड्रेशन होतं, ज्यामुळे लघवी घट्ट होते. या स्थितीत खनिज आपसात मिळून स्टोन तयार करतात. सोबतच जास्त मीठ  आणि प्रोसेस्ड फूडमुळेही सुद्धा ही समस्या वाढते. डॉक्टर सांगतात की, किडनी स्टोनसंबंधी रूग्णांची संख्या ओपीडीवर 15 ते 20 टक्के असते. पण पावसाच्या दिवसांमध्ये ही संख्या 30 टक्क्यांवर पोहोचते".

डॉक्टर सांगतात की, "गेल्या दोन महिन्यातच 23 ते 27 वयोगटातील दहापैकी चार तरूण आणि 35 ते 55 वयोगटातील दहापैकी सहा महिला किडनी स्टोनची समस्या घेऊन आल्या होत्या. किडनी स्टोन झाल्यास लघवीतून रक्त येणे, पुन्हा पुन्हा लघवी लागणे, पाठ किंवा पोटाच्या खालच्या भागात असह्य वेदना होणे, लघवी करताना जळजळ होणे ही लक्षणं दिसून येतात".

केवळ डॉक्टर गीतेच नाही तर  मेडिकॉवर हॉस्पिटलचे डॉक्टर पियूष सिंघानिया सुद्धा हेच म्हणाले की, पावसाळ्यात किडनी स्टोनच्या रूग्णांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ बघायला मिळत आहे. 

किडनी स्टोन होण्याची कारणं

डॉक्टर सिंघानिया सांगतात की, थंडीचे दिवस किंवा पावसाळ्यात लोक पाणी कमी पितात. ज्यामुळे किडनीमध्ये स्टोन होण्याचा धोका अधिक वाढतो. तसेच मीठ जास्त खाल्ल्यानं आणि प्रोसेस्ड फूड जास्त खाल्ल्यानं सुद्धा ही समस्या वाढते. ते म्हणाले की, जर वेळीच यावर उपचार केले नाही तर पुन्हा पुन्हा किडनी स्टोन इन्फेक्शन, किडनीवर सूज किंवा किडनी डॅमेज अशा समस्या होऊ शकतात. 

किडनी स्टोन टाळण्याचे उपाय

डॉक्टर गीते यांनी उपायही सांगितले. त्या सांगतात की, लाइफस्टाईलमध्ये सामान्य बदल जसे की, दिवसभर भरपूर पाणी पिणे, मीठ, प्रोसेस्ड फूड कमी खाणे अशा गोष्टी करून किडनी स्टोनचा धोका टाळता येऊ शकतो. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यमोसमी पाऊस