आजकाल अनेकांचे काम लॅपटॉपसमोर तसेच इतरही काही गॅडजेट्ससमोर तासन्तास बसून करण्याचे असते. ७–८ तास एका खुर्चीत बसून राहणे ही रोजचीच गोष्ट आहे. बाहेरून पाहता हे शांत, आरामदायक वाटले तरी शरीराला विशेषतः पचनसंस्थेला या सवयीचा जास्त फटका बसतो. हालचाल कमी असली की पोटावरचा ताण वाढतो, आतड्यांची गती मंदावते आणि त्यामुळे गॅस, जडपणा, आम्लपित्त किंवा बद्धकोष्ठता यांसारखे त्रास वाढतात.
बसून काम करताना शरीराचा खालचा भाग जणू थांबूनच जातो. जेवल्यानंतर आपण हालचाल केली तर आतड्यांचे स्नायू सक्रिय राहतात आणि पचन जलद होते. पण तासन्तास खुर्चीत बसल्यामुळे त्या स्नायूंवर जडत्व येते. पोटात वायु अडकतो, पित्त वाढते आणि शरीराला हलकेपणाची भावना नाहीशी होते. वेळेवर जेवण न करणे, मध्येच स्नॅक्स खाणे किंवा भरपूर कॅफीन पिणे यामुळेही समस्या वाढते.
अशा वेळेस काही छोट्या सवयी शरीराला मोठा दिलासा देऊ शकतात. ऑफिसमध्ये असलो तरी दर तासाला एकदा उठून चालण्याची सवय लावली तर आतड्यांना पुन्हा गती मिळते. दोन–तीन मिनिटे पाय हलवणे, कंबर ताणणे किंवा पाणी पिण्यासाठी उठणे इतकेही पुरेसे असते. हालचाल ही पचनासाठी सर्वात नैसर्गिक औषध आहे. जेवणानंतर लगेच बसू नये, किमान दहा मिनिटे ऑफिसच्या कॉरिडॉरमध्ये चालल्याने जडपणा येत नाही.
पाणी पुरेसे पिणे हेही आवश्यक आहे. सतत बसल्यामुळे शरीर सुस्तावते आणि त्याचा थेट परिणाम पचनावर होतो. गरम पाण्याचे छोटे छोटे घोट घेत राहिल्यास पोटातील वायू कमी होतो, पचन रसांची क्रिया वाढते. कॅफीन आणि चहा-कॉफीचे प्रमाण कमी करून त्याऐवजी लिंबूपाणी, कोमट पाणी किंवा सौम्य हर्बल टी घेतल्यास आराम मिळतो.
कामाच्या वेळेत जेवण हलके आणि संतुलित असावे. जड, तळलेले किंवा फार मसालेदार पदार्थ खाल्ल्यावर जर जास्त वेळ बसावे लागले तर पोटावरचा ताण आणखी वाढतो. डब्यातील अन्न घरगुती, साधे आणि पचायला सोपे असेल तर दिवसभर शरीर हलके राहते. दही, भाजी, फळे किंवा साधा डाळ-भात यामुळे पोटातील उष्णता जास्त वाढणार नाही आणि पचन व्यवस्थित राहील.
श्वसनाचे छोटे व्यायामही ऑफिसमध्ये करता येतात. दोन मिनिटे खोल श्वास घेणे आणि सोडणे यामुळे पोट मोकळे होते, ताण कमी होतो आणि शरीरात ऑक्सिजन वाढल्याने पचनसंस्था सक्रिय होते. काहींना पाठीचा त्रास असतो, त्यामुळे बसताना कंबर सरळ ठेवणे, पाय नीट टेकवणे आणि खुर्चीत बसताना योग्य पोश्चर राखणे हेही महत्त्वाचे ठरते. अवघड, वाकड्या पोझिशनमध्ये बसल्याने पोटावर अनावश्यक दबाव येतो.
काम सोडून सतत व्यायाम करणे शक्य नसले तरी थोडे चालणे, थोडा श्वासोच्छवास, हलका ताण आणि पाणी एवढ्यानेही पचनाची लय पुन्हा नीट बसते. तासन्तास बसून काम करावे लागते म्हणून पचन बिघडायलाच हवे असे नाही. शरीराला मधे मधे हालचाल, थोडासा वेळ आणि योग्य खाण्यापिण्याच्या सवयी लावल्या तर पोट हलके, मन शांत आणि काम सुरळीत पार पडते. चांगले पचन होणे फार गरजेचे असते.
Web Summary : Prolonged sitting impacts digestion, causing bloating and acidity. Simple habits like hourly walks, hydration, light meals, and breathing exercises can alleviate discomfort and improve gut health during desk jobs.
Web Summary : लंबे समय तक बैठे रहने से पाचन पर असर पड़ता है, जिससे पेट फूलना और एसिडिटी होती है। हर घंटे टहलना, पानी पीना, हल्का भोजन और सांस लेने के व्यायाम जैसी सरल आदतें बेचैनी को कम कर सकती हैं और डेस्क जॉब के दौरान पेट के स्वास्थ्य में सुधार कर सकती हैं।