Is Weekend Extra Sleep Healthy : आठवडाभर धावपळीचं जीवन जगत असताना अनेकांची झोप पूर्ण होत नाही. कामाचा वाढता ताण, मुलांची जबाबदारी, लांबचा प्रवास, जास्त वेळ फोन बघणं आणि घरातील इतर कामांमुळे झोप पूर्णच होत नाही. आपल्याला माहीत असतं की, रात्री लवकर झोपलं पाहिजे. पण रात्रीची ही वेळच आपल्या हक्काची असल्याचं जाणवतं आणि मग सिनेमा पाहिला जातो, कुणाला तरी फोन केला जातो किंवा सोशल मीडिया स्क्रोल सुरू होतं. याचा परिणाम असा होतो की, १२ कधी वाजतात कळतंच नाही. सकाळी लवकर वाजणारा अलार्म पुन्हा आपल्याला त्याच रूटीनमध्ये ढकलतो.
आठवड्यातील पाच ते सहा दिवसांची ही धावपळ आपल्या मानसिक आणि शारीरिकदृष्या आतून तोडते. अशात वीकेंडला जास्त वेळ झोपण्याचा बेत ठरलेला असतो. आठवडाभराची कमी झालेली झोप वीकेंड भरून काढल्याचा फिल येतो. मात्र, झोप केवळ आराम नाही तर शरीर आणि मेंदू रिपेअर करण्याची एक खास वेळ असते. पण आजच्या लाइफस्टाईलमुळे अनेकांची झोपच पूर्ण होत नाही. अशात थकवा, आळस जाणवतो. चेहऱ्यावर कमी झोपेची लक्षण दिसू लागतात.
काय सांगतात एक्सपर्ट?
वीकेंडला जास्त झोप घेणं अनेकांना आवडतं किंवा ते अंगवळणी पडतं. पण वीकेंडला घेतल्या जाणाऱ्या या जास्तीच्या झोपेमुळे आठवडाभराची झोपेची कमतरता भरून निघते का? याबाबत टीओआयला अंकित कुमार सिन्हा सांगतात की, वीकेंडला जास्त झोपल्याने थकवा काही वेळासाठी कमी होऊ शकतो. पण बऱ्याच दिवसांची झोपेची कमतरता यामुळे भरून निघत नाही. झोप कमी झाली तर शरीरातील हार्मोन, मेटाबॉलिज्म आणि मेंदूची कामे प्रभावित होतात. जे एक - दोन दिवस जास्त झोपल्याने सामान्य होत नाहीत.
काय काळजी घ्यावी?
सतत आठवडाभर जर झोप कमी घेतली जात असेल तर शरीर तणावाच्या स्थितीत राहतं. स्ट्रेस हार्मोन वाढतात, इम्यून सिस्टीम कमजोर होतं आणि ब्लड शुगर लेव्हलही प्रभावित होते. फोकस, स्मरणशक्ती आणि इमोशनवर नियंत्रणही ठेवणंही जरा अवघड जातं. जास्त काळ जर झोपेसंबंधी असंच होत राहिलं तर हृदयरोग, लठ्ठपणा आणि टाइप - २ डायबिटीसचा धोका वाढतो.
डॉक्टरांनुसार, या समस्यांचं समाधान हे वीकेंडला घेतली जाणारी जास्तीची झोप नाही. रोज झोपेची एक फिक्स वेळ असली पाहिजे, झोपेतून उठण्याची वेळ फिक्स असली पाहिजे. तसेच झोपण्याआधी फोन बाजूला ठेवला पाहिजे. वयस्कांनी रोज रात्री साधारण ७ ते ८ तासांची झोप घेतली पाहिजे. चांगली आणि पुरेशी झोपच आपल्या शरीराला आणि मेंदूला योग्यपणे रिकव्हर करू शकते.
