Join us

साखर वाईट म्हणून ज्यात त्यात गूळ घालता? गुळाने शुगर वाढत नाही हे खरं की खोटंच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2024 18:28 IST

Is Jaggery healthier than sugar : साखर आणि गूळ यांच्यातील कॅलरीजच्या प्रमाणाबाबत वेळीच जाणून घ्यायला हवं..

मधुमेह, शुगर, साखर हे शब्द हल्ली आपण सारखेच ऐकतो. कारण घरोघरी अगदी कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला मधुमेह असल्याचे पाहायला मिळते. मधुमेह म्हटला की पहिली साखर कमी केली जाते. साखरेचा चहा, गोडाचे पदार्थ या सगळ्यावर बंधने येतात. मग साखर नको तर साखरेला पर्याय असलेला खजूर, मध, गूळ यांसारखे घटक वापरुन तयार झालेले गोडाचे पदार्थ खाल्ले जातात. इतकेच काय तर बरेच जण मधुमेह झाल्यावर किंवा झाला नसला तरीही गुळाचा चहा पितात. शिरा, खीर यांमध्येही हे लोक आवर्जून गुळाचा वापर करतात. असं केल्याने खरंच रक्तातील साखर वाढण्यावर नियंत्रण येतं का, गूळ हा साखरेला खरंच पर्याय ठरु शकतो का हे समजून घेणं गरजेचं आहे(Is Jaggery healthier than sugar) . 

साखर ही जशी मधुमेहासाठी किंवा सामान्यांसाठीही चांगली नाही त्याचप्रमाणे गुळामध्ये तितक्याच कॅलरीज असतात की कमी असतात हे आपण समजून घ्यायला हवं. मधुमेह ही जीवनशैलीविषयक समस्या असून रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की आरोग्याच्या इतरही तक्रारी सुरू होतात. ही गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत जाते आणि मग परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर आपण काहीच करु शकत नाही. त्यापेक्षा आधीपासूनच आहाराबाबत योग्य ती काळजी घेणं केव्हाही चांगले. पाहूयात साखर नको म्हणून गूळ खाण्यात कितपत तथ्य आहे..

१. साखरेवर खूप जास्त प्रक्रिया झाल्याने ती आरोग्यासाठी चांगली नसते हे बरोबर आहे. 

२. गुळावर तुलनेने कमी प्रक्रिया होते त्यामुळे गुळात खनिजे, जीवनसत्त्वे, लोह आणि अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण जास्त असते. 

३. मात्र पोषक तत्त्व असल्याने गूळ आरोग्यासाठी चांगला आहे असे म्हटले तरी त्यातही साखरे इतक्याच कॅलरीज असतात. त्यामुळे कॅलरीजची तुलना केली तर गूळ आणि साखर सारखेच असतात.

४. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम हे घटक असतात त्याप्रमाणे रिफाईंड शुगरमध्ये म्हणजेच आपण वापरत असलेल्या साखरेत पोषक घटक अजिबात नसतात. 

५. पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यासाठी गूळ उपयुक्त ठरतो, तर शरीरातील अनावश्यक घटक बाहेर काढण्यासाठीही गुळातील अँटीऑक्सिडंटस फायदेशीर असतात.  

६.  पण तुम्ही वजन कमी करण्यासाठी किंवा मधुमेह नियंत्रणात येण्यासाठी साखर बंद करत असाल तर गुळही बंद करायला हवा कारण दोन्हीतून शरीराला तितक्याच कॅलरीज मिळतात.

टॅग्स : आरोग्यलाइफस्टाइलआहार योजनाहेल्थ टिप्स