Old Water Bottle Side Effects : अनेकदा कारने कुठे लांबचा प्रवास करत असताना आपण बाहेरूण पाण्याची बॉटल विकत घेतो आणि त्यातील थोडं पाणी पिऊन तशीच कारमध्ये ठेवतो. नंतर कधीतरी कामात पडेल म्हणून ही बॉटल कारमध्येच अनेक दिवस ठेवली जाते. काही दिवसांनी तेच पाणी प्यायलं जातं. पण हे पाणी सुरक्षित असतं का? याचा कधी फारसा कुणी विचार करत नाही. अलिकडेच ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर मनन वोरा यांनी याबाबत माहिती देणारा एक महत्वाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
सुरक्षित असतं का गाडीत ठेवलेलं पाणी?
डॉक्टर मनन सांगतात की, कारमध्ये ठेवलेली जु्न्या बॉटलमधील पाणी पिणं खूप जास्त घातक ठरू शकतं. आपल्याला माहीत असेलच की, कार जेव्हा उन्हात उभी राहते, तेव्हा आतील तापमान खूप जास्त वाढतं. या उष्णतेमुळे प्लास्टिकचा बॉटल झिजू लागते म्हणजे डिग्रेड होऊ लागते. अशात प्लास्टिकमधील घातक रसायन पाण्यात मिसळतात. हे पाणी प्यायल्यावर यातील केमिकल्स शरीरातील हार्मोन सिस्टीमचं नुकसान करतात. इतकंच नाही तर या केमिकल्समुळे आरोग्याचं मोठं नुकसानही होतं. या पाण्याने डोकेदुखी, पोट बिघडणे आणि हार्मोनमध्ये असंतुलन अशा समस्यांचा धोका खूप असतो. त्यामुळे हे पाणी न पिता फेकण्याचा सल्ला ते देतात.
मिनरल वॉटर सेफ असतं का?
अनेक लोक विचार करतात की, मिनरल वॉटर बॉटल सुरक्षित असते. त्यामुळे हे बरेच दिवस कारमध्ये तसंच राहिलेलं पाणी प्यायल्याने काही होणार नाही. पण सत्य तर हे आहे की, बॉटल कोणत्याही ब्रॅन्डची असो, ती प्लास्टिकचीच असते. बॉटल गरम झाल्यावर त्यातील तत्व पाण्यात मिक्स होतात. त्यामुळे अशा बॉटल कारमध्ये जास्त वेळ ठेवणं योग्य नाही आणि त्यातील पाणी पिणं तर अजिबातच योग्य नाही. कारने कुठे जाणार असाल तर स्टीलच्या बॉटलमध्ये घरातून पाणी घ्या किंवा पाण्याची बॉटल घेतली तर ती लगेच संपवा.
