आरोग्याच्या दृष्टीने हिवाळा हा ऋतू अत्यंत आव्हानात्मक मानला जातो. याच कारणामुळे हिवाळ्यात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये मोठा बदल होतो. कडाक्याच्या थंडीत नारळ पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया...
सामान्यतः नारळ पाणी हे उन्हाळ्यातील पेय मानलं जातं, कारण ते थंड असतं. मात्र, आरोग्य तज्ज्ञ आणि आयुर्वेदानुसार जर ते योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने प्यायले तर हिवाळ्यातही ते शरीरासाठी वरदानापेक्षा कमी नाही. माहितीच्या अभावामुळे ९०% लोक हिवाळ्यात नारळ पाणी पिणं बंद करतात, परंतु याचे फायदे अद्भूत आहेत.
पाण्याची कमतरता दूर करते
हिवाळ्यात आपल्याला तहान कमी लागते, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. अशा स्थितीत, शरीराला आतून हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि नैसर्गिकरित्या द्रवपदार्थांची पूर्तता करण्यासाठी नारळ पाणी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
पोषक तत्वांचा खजिना
नारळ पाण्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांसारख्या खनिजांचा साठा असतो. हे घटक हिवाळ्यात जाणवणारी स्नायूदुखी आणि थकवा दूर करण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त यातील अँटी-ऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, ज्यामुळे सर्दी-खोकल्यासारख्या संसर्गापासून बचाव होतो.
हिवाळ्यात शहाळ्याचे पाणी पिताना 'ही' काळजी घ्या़
थंडीच्या दिवसात शहाळ्याचे पाणी पिताना काही खबरदारी घेणं आवश्यक आहे. थंड असल्याने सकाळी खूप लवकर किंवा रात्री उशिरा ते पिणे टाळावं. जर तुम्हाला खोकला, दमा किंवा सायनसचा त्रास असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचे सेवन करू नका.
पिण्याची योग्य वेळ
हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याची सर्वोत्तम वेळ दुपारची असते, जेव्हा ऊन पडलेलं असतं. या वेळी प्यायल्याने शरीराचं तापमान संतुलित राहतं आणि त्यातील पोषक तत्वं शरीरात पूर्णपणे शोषली जातात.
