Salt Water Gargling : मिठाच्या पाण्याने गुरळा करणे हा एक जुना घरगुती उपाय आहे. तुम्ही अनेकदा तुमच्या आजी-आजोबांना असे करताना पाहिले असेल. पण तुम्हाला माहिती आहे का की पाण्यात मीठ घालून गुरळा केल्याने नेमके काय फायदे होतात? जर नाही, तर हा सोपा उपाय तुम्हाला अनेक प्रकारे उपयोगी ठरू शकतो. चला तर मग, मीठाच्या पाण्याने गुरळा करण्याचे फायदे, योग्य पद्धत आणि प्रमाण जाणून घेऊया.
मिठाच्या पाण्याने गुरळा करण्याचे फायदे
तोंडातील घातक बॅक्टेरिया नष्ट होतात
हेल्थलाइनच्या अहवालानुसार, मिठाच्या पाण्याने गुरळा करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तोंडातील नुकसानकारक बॅक्टेरिया कमी होतात. मिठाच्या पाण्यामुळे तोंडातील pH लेव्हल वाढते, त्यामुळे बॅक्टेरियांची वाढ थांबते.
पिवळे दात स्वच्छ होण्यास मदत
तोंडातील बॅक्टेरिया कमी झाल्यामुळे प्लाक कमी तयार होतो. त्यामुळे दातांवर साचलेला प्लाक हळूहळू साफ होऊ लागतो आणि दात अधिक स्वच्छ व चमकदार दिसतात. यासोबतच हिरड्यांची सूजही कमी होते.
जखमा लवकर भरतात
दात काढल्यानंतरही डॉक्टर मीठाच्या पाण्याने गुरळा करण्याचा सल्ला देतात. यामुळे मऊ टिश्यूला नुकसान न होता जखम लवकर भरायला मदत होते. मात्र लक्षात ठेवा दात काढल्यानंतर 24 तासांनंतरच गुरळा सुरू करा आणि गुरळा करताना पाणी जोरात तोंडात फिरवू नका.
घसा दुखणे आणि जळजळीत आराम
मिठाचे पाणी फक्त तोंडाच्या स्वच्छतेसाठीच नाही, तर घसा आणि श्वसनमार्गासाठीही फायदेशीर ठरतं. सर्दी, खोकला किंवा फ्लूच्या वेळी मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास घसा स्वच्छ होतो आणि संसर्ग लवकर कमी होण्यास मदत होते. यामुळे घशातील वेदना, जळजळ किंवा अॅलर्जीमुळे आलेली सूजही कमी होते.
किती पाण्यात किती मीठ घालावे?
एका ग्लास कोमट पाण्यात साधारण एक चमचा मीठ घाला. सुरुवातीला खूप तीव्र वाटत असेल, तर अर्धा चमचा मीठ वापरू शकता. हे पाणी एकदाच वापरायचे. तयार करून ठेवू नका. प्रत्येक वेळी नवीन पाणी तयार करा.
रोज मिठाच्या पाण्याने गुरळा करावा का?
अहवालानुसार, जर तुमच्या हिरड्या खूप सेंसिटिव्ह असतील तर वारंवार मीठाच्या पाण्याने गुरळा केल्याने नुकसान होऊ शकतं. तुम्ही रोज गुरळा करू शकता, पण दिवसातून फक्त एकदाच करा. तसेच गुरळा केल्यानंतर पाणी गिळू नका.
