Burp Test Viral Video Fact : सोशल मीडियावर वेगवेगळ्या मनोरंजनाच्या गोष्टींसोबतच आरोग्यासंबंधी माहिती देणाऱ्या पोस्टचा जणू महापूरच आला आहे. सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात गरम पाणी पिण्यासंबंध एक टेस्ट सांगण्यात आली आहे. यात असा दावा करण्यात आला आहे की, गरम पाण्याने केली जाणारी 'बर्प टेस्ट' आतडीची समस्या आणि शरीरात टॉक्सिन जमा झाल्याचं सांगते, असा दावा केला जातोय.
या टेस्टनुसार, उपाशीपोटी 1 ग्लास गरम पाणी एक-एक घोट करून प्यायचे. जर 60 सेकंदांच्या आत ढेकर आली, तर शरीरात टॉक्सिन साचले आहेत, गट हेल्थ बिघडलेली आहे आणि मेटाबॉलिझमशी संबंधित समस्या आहेत, असे मानले जाते. जर ढेकर आली नाही, तर सर्व काही ठीक आहे, असा दावा केला जातो.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हजारो लोकांनी हा टेस्ट करून पाहिला. पण प्रश्न असा निर्माण झाला की, खरंच ढेकर येणे म्हणजे शरीरात टॉक्सिन असणे किंवा गट हेल्थ खराब असणे याचा पुरावा आहे का? याबाबत फरीदाबाद येथील मेट्रो हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे डायरेक्टर डॉ. विशाल खुराणा यांनी एका वेबसाईटला माहिती दिली. त्यांनी स्पष्ट सांगितले की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अशा टेस्ट पूर्णपणे भ्रामक आहेत. गरम पाणी प्यायल्यावर ढेकर येणे ही सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे, त्याचा आरोग्याशी थेट संबंध नाही.
गरम पाणी प्यायल्यावर ढेकर म्हणजे टॉक्सिन असल्याचा संकेत आहे का?
ढेकर येणे आणि शरीरात साचलेले टॉक्सिन यांचा कोणताही वैज्ञानिक संबंध नाही. शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचे काम लिव्हर आणि किडनी नैसर्गिकरित्या करतात. गरम पाणी स्नायूंना सैल करते आणि पेरिस्टालसिस वाढवून पचनाला थोडी मदत करते. मात्र ढेकर येण्याचे कारण म्हणजे आत गेलेली हवा किंवा तात्पुरता pH बदल, ज्यामुळे अन्ननलिकेचा स्फिंक्टर रिलॅक्स होतो. त्यामुळे ढेकर येणे म्हणजे शरीरात टॉक्सिन आहेत, हा दावा फक्त एक व्हायरल ट्रेंड आहे.
ढेकर न येणे म्हणजे तुम्ही फिट आहात का?
डॉक्टरांच्या मते, ढेकर न येणे हे कधी-कधी पोटातील आम्लाची कमतरता, डिहायड्रेशन किंवा एखाद्या गंभीर समस्येचे संकेत असू शकते. पण ते चांगल्या पचनसंस्थेचा पुरावा नाही. वारंवार ढेकर येणे हे GERD किंवा आहाराशी संबंधित समस्यांचे लक्षण असू शकते.
ढेकर येत असल्यास कधी काळजी घ्यावी?
जर सतत पोट फुगणे, पोटदुखी, अॅसिड रिफ्लक्स, वजन अचानक कमी होणे अशी लक्षणे दिसत असतील, तर अल्ट्रासाऊंड किंवा एंडोस्कोपीसारख्या तपासण्या करणे गरजेचे आहे. गरम पाणी सामान्यतः सुरक्षित असतं, पण अतिशय गरम पाणी पिणे टाळा, कारण त्यामुळे अन्ननलिकेला इजा होऊ शकते.
