Constipation Natural Home Remedy : सकाळी झोपेतून घाई गडबडीत उठून टॉयलेटला गेल्यावर जर पोट साफ होत नसेल, तर यापेक्षा वाईट दिवसाची सुरूवात आणखी कोणती असू शकत नाही. कारण जर सकाळी बराच वेळ टॉयलेटमध्ये घालवूनही पोट साफ झालं नाही तर पूर्ण दिवस अस्वस्थ वाटतं. ना कामात लक्ष लागत ना एका जागेवर व्यवस्थित बसता येत. हल्ली भरपूर लोकांना पोट साफ न होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात होते. अशावेळी अनेक जण औषधांचा आधार घेतात. पण काही महत्त्वाचे लाइफस्टाइल बदल केल्यास बद्धकोष्ठतेपासून नॅचरली सुटका मिळू शकते, हे अनेकांना माहीत नसतं. औषधं घेण्याऐवजी रात्री जर एक सोपा उपाय केला तर सकाळी काही मिनिटात आपलं पोट साफ होऊ शकतं. चला पाहुयात काय आहे हा उपाय...
रात्री काय प्यावं?
इथे आपण ज्या पाण्याबद्दल बोलत आहोत ते म्हणजे ओव्याचं पाणी. रात्री झोपण्यापूर्वी ओव्याचं पाणी प्यायल्यास सकाळी पोट नीट साफ होतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. याशिवाय, ओव्याचं पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. चला तर मग जाणून घेऊया, ओव्याचे पाणी पिण्याचे इतर फायदे.
पचनक्रिया सुधारते
ओव्यात थायमोल नावाचं फार फायदेशीर असं तत्व असतं. जे पचनरस तयार करण्यास मदत करतं. त्यामुळे पोटफुगी, गॅस आणि अपचनाची समस्या कमी होते. त्यामुळे बऱ्याच काळापासून असलेली बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास खूप फायदेशीर होतं.
वजन कमी करण्यास मदत
ओव्याचं पाणी मेटाबॉलिझम बूस्ट करतं, ज्यामुळे शरीरातील चरबी लवकर जळण्यास मदत होते. रोज सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.
सर्दी, खोकला आणि दमा यामध्ये आराम
ओवा उष्ण असतो, ज्यामुळे श्वसनसंस्था स्वच्छ ठेवण्यास मदत करतो. ओव्याने कफ बाहेर निघतो आणि बंद नाक उघडण्यास प्रभावी ठरतो. दमा असलेल्या रुग्णांसाठी ओव्याचं सेवन अधिक फायदेशीर मानलं जातं.
सांधेदुखी कमी होते
ओव्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे शरीरातील सूज कमी करतात. संधिवात असलेल्या रुग्णांसाठी ओव्याचं पाणी वेदना कमी करण्याचा एक नैसर्गिक उपाय ठरू शकतो.
