Smartphone Addiction Side Effects : आज स्मार्टफोन आपली गरज राहिली नसून एक व्यसन झालं आहे. काही काम असो किंवा मनोरंजन, स्मार्टफोनशिवाय सगळं अपूर्ण वाटतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, याच स्मार्टफोनच्या व्यसनाचा आपल्या शरीरावर भविष्यात काय परिणाम होऊ शकतो? याबाबत अलिकडेच एक रिपोर्ट समोर आला आहे. अलीकडेच एका स्टेप-ट्रॅकिंग अॅपने एक मॉडेल तयार केलं आहे, ज्याचं नाव 'सॅम' आहे. हे मॉडेल दाखवतं की जर आपण आपली सध्याची लाइफस्टाईल तशीच ठेवली, तर 2050 पर्यंत मानवाचा शरीरिक बदल कसा दिसू शकतो, आणि हे परिणाम खरंच धक्कादायक आहेत.
2050 मध्ये “फोन एडिक्ट” माणूस कसा दिसेल? 2050 पर्यंत स्मार्टफोनचं व्यसन आपल्या शरीरात मोठे बदल घडवू शकतं. पोश्चर बदलणे, मान पुढे झुकलेली, पाठ गोलाकार, खांदे खाली झुकलेले, याला 'टेक नेक' म्हणतात. मोबाईल किंवा लॅपटॉपकडे सतत पाहिल्याने हा त्रास वाढतो आणि मानदुखी, पाठदुखी कायम राहू शकते.
डोळे आणि चेहरा
सॅमच्या लाल, थकलेल्या डोळ्यांवरून आणि काळ्या वर्तुळांवरून दिसतं की स्क्रीनचा प्रकाश आणि झोपेची कमतरता चेहऱ्यावर किती परिणाम करू शकते. सतत स्क्रीनकडे पाहिल्याने डोळे कोरडे होणे, जळजळ, वेदना सामान्य होतील.
शरीरातील इतर बदल
एआय मॉडेलमध्ये सॅमचे सूजलेले पाय आणि टाच दिसतात. हे दीर्घकाळ बसून राहणे आणि कमी हालचालीचं परिणाम आहे. यामुळे ब्लड सर्कुलेशन कमी होणे, व्हेरिकोज वेन्स, ब्लड क्लॉट्स अशा गंभीर समस्या उद्भवू शकतात. पोट वाढणे, वजन वाढणे आणि स्नायूंमध्ये कमजोरी ही सुद्धा सामान्य लक्षणे होतील. फक्त शरीर नाही, मनसुद्धा प्रभावित होतं.
स्मार्टफोनचं व्यसन शारीरिकच नाही, तर मानसिक आरोग्यालाही नुकसान करतं. तासन्तास सोशल मीडियावर स्क्रोल केल्याने आपण हळूहळू इतर लोकांपासून दूर जातो. यामुळे ताण, चिंता, नैराश्य या समस्या वाढू लागतात. ही एक सायलेंट सायकल बनते जितका वेळ फोनवर, तितकं आपण वास्तवापासून दूर आणि हे दूरावणं आपल्याला अजून उदास आणि निष्क्रिय बनवतं.
उपाय – अजूनही वेळ आहे!
थोडेसे बदल आपल्याला या धोकादायक भविष्यापासून वाचवू शकतात. दररोज थोडा वेळ फोनपासून दूर राहा. एक्सरसाइज, योगा किंवा चालणे रोजच्या रूटीनमध्ये आणा. खऱ्या लोकांशी, खऱ्या जगाशी जोडण्याचा प्रयत्न करा. झोपेची वेळ फिक्स करा. स्क्रीन टाइम कमी करण्याचे नियम बनवा.
