Health Tips : पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे दूषित होतं. त्यामुळे पावसाळ्यात डायरिया (diarrhoea) किंवा कॉलरा (cholera) होण्याचा धोका वाडतो. अशात वेळीच काही गोष्टींची काळजी घेतली तर डॉक्टरांकडे जाण्याची आणि पैसे खर्च करण्याची वेळ येणार नाही. डायरिया आणि कॉलरासारख्या आजाराच्या मुख्य कारणात अस्वच्छता असतं. त्यामुळे या दिवसात स्वच्छतेवर अधिक भर द्यावा लागतो.
हात चांगले स्वच्छ ठेवा
डायरिया किंवा इतरही आजारांपासून बचाव करण्यासाठी सगळ्यात गरजेचं आहे ते हात चांगले धुणं. यासाठी जेवणाआधी हात साबणानं आणि पाण्यानं कमीत कमी २० सेकंद धुवावे. हात धुतल्यानं डायरियासाठी जबाबदार कीटाणू मरतात आणि तुम्ही सुरक्षित राहता.
स्वच्छ पाणी प्या
पावसाळ्यात डायरिया आणि जुलाब होण्याच्या मुख्य कारणात पाणी असतं. दूषित पाणी तुम्हाला काही दिवसांसाठी आजारी पाडू शकतं. त्यामुळे पाणी स्वच्छ प्या. शक्य झाल्यास पाणी उकडून आणि थंड करून प्या.
फळं आणि भाज्या चांगल्या स्वच्छ करा
या दिवसांमध्ये घरात आणलेली फळं आणि भाज्या धुण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करा. कापलेली फळं आणि भाज्या जास्त वेळ उघड्यावर ठेवू नका.
ताजं जेवण करा
पावसाळ्यात पोटासंबंधी समस्या खूप जास्त होतात. त्यामुळे ताजं आणि गरम अन्न खा. अन्न उघड्यावर ठेवू नका. भांडी स्वच्छ ठेवा.
बाहेरचं खाणं टाळा
हॉटेल, ठेले किंवा स्टॉलवर या दिवसात स्वच्छतेची पुरेशी काळजी घेतली जात नाही. माशा आणि डास भरपूर वाढतात. अशात बाहेरचं खाऊन तुम्हाला डायरियाचा धोका होऊ शकतो.