सध्याच्या काळात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बिघडलेल्या लाईफस्टाईलमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचे प्रमाण वाढते. आरोग्याच्या या वाढत्या समस्यांपैकी एक फारच कॉमन समस्या म्हणजे 'फॅटी लिव्हर'. ही समस्या हल्ली मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते, पूर्वी फॅटी लिव्हरचा त्रास फक्त वृद्धांमध्येच जास्त प्रमाणात दिसायचा पण आता ऐन तरुण वयात देखील बहुतेकांना हा त्रास जाणवत आहे. आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव असलेले यकृत (Liver) जेव्हा निष्क्रिय होते किंवा त्याच्या पेशींमध्ये चरबीचे प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त वाढते, तेव्हा ही फॅटी लिव्हरची समस्या सुरू होते(how to reduce fatty liver naturally).
सुरुवातीच्या टप्प्यात याची कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नसली तरी, जर याकडे दुर्लक्ष केले तर पुढे जाऊन लिव्हर निकामी होण्याचा धोका वाढतो. यासाठीच, फॅटी लिव्हरचा त्रास होऊ नये किंवा ज्यांना ही समस्या आहे त्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी वेळीच जागरूक राहणे आणि योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. फक्त लाईफस्टाईल आणि आहारात थोडेफार साधे बदल करून आपण आपल्या लिव्हरची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकतो. फॅटी लिव्हरची समस्या दूर करण्यासाठी नेमके कोणते घरगुती उपाय फायदेशीर ठरु शकतात, ते पाहूयात...
फॅटी लिव्हरची समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय...
आयुर्वेद तज्ज्ञ किरण गुप्ता यांनी सांगितले की, ज्या लोकांना फॅटी लिव्हरची समस्या आहे, त्यांनी ओमेगा - ३ आणि कमी प्रोटीन असलेले पदार्थ खावेत. यासोबतच, फायबरयुक्त भाज्यांचा आहारात समावेश करावा. शिजवलेल्या भाज्यांपेक्षा कच्च्या भाज्यांचे सॅलॅड खाणे अधिक फायदेशीर ठरते. नियमितपणे रोज काही मिनिटे जलद गतीने चालणे किंवा योगा आणि प्राणायाम करणे फायदेशीर ठरू शकते. तसेच, पुरेशी विश्रांती घ्या आणि रोज ७ ते ८ तासांची झोप नक्की घ्या. दिवसातून २.५ ते ३ लिटर पाणी पिण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. लो, फॅट दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा आहारात कमी प्रमाणात समावेश करावा. लिंबू आणि मधाचे पाणी रोज प्यायल्याने देखील या फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळवता येतो. याव्यतिरिक्त, दुधीभोपळ्याचा रस, कोहळ्याचा रस पुदीन्याचा रस फॅटी लिव्हरशी संबंधित समस्यांवर खूप फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. काही मसाले देखील या फॅटी लिव्हरच्या समस्येसाठी उपयुक्त मानले जातात, ओवा, बडीशेप आणि अख्खे धणे या सर्वांचे पाणी (उकळून किंवा भिजवून) पिणे फॅटी लिव्हरच्या समस्येवर असरदार ठरु शकते.
फॅटी लिव्हरची समस्या कमी करण्यासाठी, प्रामुख्याने आहारात बदल करणे गरजेचे असते. हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. मेथी, दुधीभोपळा, दोडक आणि भेंडी सारख्या भाज्या खा. बाजारात मिळणारे तेलकट, मसालेदार, आणि जंकफूड खाणे टाळा. दारू आणि धूम्रपान यांसारख्या सवयी पूर्णपणे सोडून देणे आवश्यक आहे. यासोबतच, जर तुमचे वजन जास्त असेल, तर ते कमी करणे खूप महत्त्वाचे आहे.
डायबिटीस वाढेल म्हणून दिवाळीत गोड खाणारच नाही ? ५ टिप्स, गोड खाऊनही शुगर वाढणार नाही...
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी रोज व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही दररोज २० ते ३० मिनिटे सकाळी आणि संध्याकाळी वॉकिंगला जाऊ शकता. जास्त वेळ उभे राहून किंवा बसून काम करत असाल, तर मध्ये थोडा वेळ काढून स्ट्रेचिंग करा. याशिवाय सूर्य नमस्कार, कपालभाती आणि अनुलोम-विलोम, प्राणायाम करा. हे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते. तुम्ही रोज मेडिटेशन देखील करू शकता. याव्यतिरिक्त, दररोज ७ ते ८ तास पूर्ण झोप घेणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला आराम मिळतो आणि फॅटी लिव्हरची समस्या कमी होण्यास मदत होते.