Underarm Smell : पावसाळा असो वा उन्हाळा घामाचा वास येणं ही एका कॉमन समस्या आहे, ज्यामुळे जास्तीत जास्त लोक वैतागलेले असतात. बरं ज्यांच्या घामाचा वास येतो, त्यांना तर त्रास होतोच, सोबतच त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनाही याचा त्रास होतो. लोक आपल्यापासून दूर पळू लागतात किंवा चारचौघात लाज काढतात. घामाच्या वासानं आत्मविश्वासही कमी होतो. योग्यपणे स्वच्छता न करणं किंवा इतरही काही कारणांमुळे घामाचा वास येतो. अशात यावर काही सोपे घरगुती देखील केले जाऊ शकतात. महत्वाची बाब म्हणजे हे नॅचरल उपाय खूपच प्रभावी ठरतात.
तुरटीचा करा वापर
तुरटीमध्ये नॅचरल अॅंटी-सेप्टीक गुण असतात. यातील तत्वांमुळे घामाचा वास दूर करण्यास खूप मदत मिळते. यासाठी एकतर आपण आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवू शकता किंवा तुरटी पाण्यात भिजवून काखेत फिरवा. यानं घामाचा वास येणं बंद होईल.
लिंबाचा करा वापर
लिंबामधील अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-सेप्टिक गुण वासासाठी जबाबदार बॅक्टेरिया नष्ट करतात. हा उपाय करण्यासाठी एक लिंबू कापून काखेत घासा आणि १० ते १५ मिनिटांनी कोमट पाण्यानं साफ करा. रोज हा उपाय केल्यास वास कमी होईल आणि त्वचाही साफ होईल. जर यानं त्वचेवर जळजळ होत असेल तर वेगळा उपाय करा.
बेकिंग सोडा आणि पाणी
बेकिंग सोडा घामाचा वास दूर करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. यातील तत्वांनी घाम कमी करण्यास आणि वासाचे बॅक्टेरिया नष्ट कऱण्यास मदत मिळते. यासाठी १ चमचा बेकिंग सोड्यात थोडं पाणी टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट काखेत लावा. १० मिनिटांनी काख पाण्यानं धुवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय करू शकता.
अॅपल व्हिनेगर
अॅपल व्हिनेगर शरीराचा पीएच लेव्हल बॅलन्स करतं आणि बॅक्टेरियाही कमी करतं. हा उपाय करण्यासाठी कापसाच्या बोळ्यावर थोडं व्हिनेगर लावा आणि बोळा काखेत फिरवा. व्हिनेगर सुकू द्या आणि नंतर पाण्यानं धुवून घ्या. हा उपाय आपण रोज करू शकता.
टी ट्री ऑइल
टी ट्री ऑइलमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअ गुण असतात, जे काखेतील घामाचा वास नाहीसा करतात. यासाठी ट्री ट्री ऑइलचे काही थेंब पाण्यात टाकून स्प्रेसारखा वापर करू शकता. किंवा थेट कापसाच्या बोळ्यानं काखेत लावू शकता. यानं घामाचा वास दूर होईल.