Bloating Home Remedies: जेवण केल्यावर पोटात गॅस किंवा पोट फुगण्याची समस्या अनेकांना नेहमीच होते. एकदा का पोटात गॅस जमा झाला तर कशातही लक्ष लागत नाही. दिवसभर अस्वस्थ वाटतं. बरं पोटात गॅस होण्याला आपल्याच काही चुका कारणीभूत असतात. जसे की, घाईघाईने जेवणं करणं आणि यावेळी पोटात जास्त हवा जाते. सोबतच जास्त खाणे, बद्धकोष्ठता, लिव्हरचा आजार, गर्भावस्था यामुळे ब्लोटिंगची समस्या होते. त्याशिवाय बीन्स, डाळी, ब्रोकोली, कोबी, जास्त मीठ असलेले पदार्थ आणि दुधामुळेही ही समस्या होऊ शकते.
अनेक न्यूट्रिशनिस्ट आणि डायटीशिअन सांगतात की, पोटातील गॅस कमी करण्याचे अनेक उपाय आहेत. ज्यात काही मसाले आणि जडीबुटींचा समावेश आहे. जे पचनाला मदत करतात आणि आतड्यांचं काम चांगलं करून पोटातील गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतात.
आलं आणि पुदिन्याचा चहा
आलं अपचन, मळमळ आणि सूज कमी करण्यासोबतच अनेक पचनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी चांगला उपाय आहे. आल्यामध्ये कार्मिनेटिव असतं, जे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये गॅस कमी करतं. तुम्ही आल्याचा चहा बनवून पिऊ शकता आणि यात पुदिन्याची पानं टाकायला विसरू नका. तुम्ही आलं अशा गोष्टींमध्ये टाकू शकता ज्याने गॅस तयार होतो, जसे की, डाळी, छोले, राजमा इत्यादी.
बडीशेपचं पाणी
जेवण केल्यावर बडीशेप खाल्ल्याने पचन प्रक्रिया चांगली होते. याने पोटातील गॅस आणि सूजही कमी होते. दुसरा उपाय हा आहे की, बडीशेप, थोडं आलं आणि चिमुटभर हिंग व चिमुटभर काळं मीठ टाकून चहा करा. तिसरा उपाय म्हणजे, पाण्यात बडीशेप, जिरे आणि धणे मिक्स करून पाणी गरम करून पिऊ शकता.
ओवा आणि पुदिन्याचं पाणी
एका भांड्यात तुम्ही पाणी, ओवा आणि सैंधव मीठ टाकून पाणी गरम करा. हे पाणी कोमट करून जेवण झाल्यावर प्याल तर पोट फुगणं किंवा गॅसची समस्या होणार नाही. त्याशिवाय दिवसभर थोडं थोडं पुदिन्याचं पाणी प्या.
हिंग आणि जिऱ्याचा तडका
डाळ, राजमा, छोले बनवताना आलं, ओवा, हिंग, धणे, बडीशेप आणि जिऱ्याची पूड अशा मसाल्यांचा तडका द्यावा. याने टेस्ट तर चांगली होईलच सोबतच पोट फुगण्याची आणि गॅसची समस्याही होणार नाही.