Join us
Daily Top 2 Weekly Top 5

मठातलं पाणी थंड असेल पण शुद्ध आहे का? ५ गोष्टी करा - नाहीतर माठातल्या पाण्यात होतात अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2026 13:32 IST

How to clean clay pots ? health care tips, never drink before doing these tests : माठातील पाणी पिण्याआधी अजिबात विसरु नका या गोष्टी.

उन्हाळ्यात माठातील थंडगार पाणी पिण्याची मजाच वेगळी असते. फ्रिजच्या पाण्यापेक्षा माठाचं पाणी शरीरासाठी अधिक नैसर्गिक आणि आरामदायी मानलं जातं. त्यामुळे अनेक घरांमध्ये आजही माठ वापरण्याची परंपरा कायम आहे. (How to clean clay pots ? health care tips, never drink before doing these tests )मात्र माठ योग्य प्रकारे वापरला नाही तर त्यातील पाणी खराब होऊ शकतं. अनेकदा दोन-तीन दिवसांत पाण्यात किडे किंवा बारीक जंतूसारखे पदार्थ दिसू लागतात. यामागे काही साध्या चुका कारणीभूत असतात.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन माठ वापरण्यापूर्वी तो नीट स्वच्छ धुणे गरजेचे असते. अनेकजण बाजारातून आणलेला माठ फक्त पाण्याने धुऊन वापरायला सुरुवात करतात. पण माठ बनवताना त्यात माती, धूळ किंवा इतर सूक्ष्म कण राहिलेले असतात. त्यामुळे सुरुवातीला माठ चांगला धुऊन काही तास स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवणे आवश्यक असते.

माठातील पाणी रोज बदलणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकदा उरलेलं पाणी दोन-दोन दिवस तसेच ठेवले जाते. उष्ण वातावरणामुळे अशा पाण्यात जंतू वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळे दररोज माठ रिकामा करून स्वच्छ पाणी भरल्यास पाणी ताजं राहण्यास मदत होते. माठ उन्हात किमान तासभर ठेवणे गरजेचे आहे. तसेच माठाच्या बाहेरूनही सतत पाणी ओतणे गरजेचे असते. 

माठ ठेवण्याची जागाही स्वच्छ आणि हवेशीर असावी. स्वयंपाकघरातील ओलसर किंवा घाणेरड्या जागेत माठ ठेवल्यास त्याभोवती बुरशी किंवा किडे तयार होऊ शकतात. माठ नेहमी स्वच्छ स्टँडवर ठेवावा आणि त्यावर झाकण ठेवणेही आवश्यक आहे. उघडा माठ ठेवल्यास धूळ, माशा किंवा इतर कीटक पाण्यात जाऊ शकतात.

माठ साफ करताना फक्त पाण्याने धुणे पुरेसे नसते. आठवड्यातून किमान एकदा माठ आतून हलक्या हाताने स्वच्छ घासून धुवावा. यासाठी कडक साबण वापरण्याऐवजी कोमट पाणी किंवा हलकं मीठ वापरलं तरी चालू शकतं. त्यामुळे आत साचलेला चिकटपणा आणि घाण साफ होते. मीठाच्या पाण्याने माठ धुतल्यावर त्यात जंतू राहत नाहीत.  

माठातील पाणी स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी या छोट्या सवयी खूप महत्त्वाच्या ठरतात. योग्य काळजी घेतली तर माठातील पाणी फक्त थंडच नाही तर आरोग्यासाठीही सुरक्षित राहू शकतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Clay Pot Water: Is it Pure? 5 Tips for Safety.

Web Summary : Enjoy cool clay pot water, but ensure purity! Clean new pots thoroughly, change water daily, maintain hygiene, and wash weekly with mild salt water for safe, healthy hydration.
टॅग्स : हेल्थ टिप्ससमर स्पेशलउन्हाळाआरोग्यपाणी