How Often Should You Change Your Bath Towel : टॉवेल आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग असतो. म्हणजे असा की, रोज आंघोळ केल्यावर किंवा हात-पाय धुतल्यावर पुसण्यासाठी टॉवेल लागतोच लागतो. रोज अंग पुसून पुसून अंगावरील बॅक्टेरिया आणि फंगस टॉवेलवर चिकटून बसतात. ज्यामुळे त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. हेल्थ एक्सपर्ट सतत सल्ले देतात की, घरातील चादरी, उशीचे कव्हर, अंडरवेअर यांच्यासोबतच टॉवेलही वेळोवेळी बदलायला हवेत. पण याकडे काही होणार नाही असं म्हणून जास्तीत जास्त लोक दुर्लक्ष करतात. टॉवेलबाबत असा विचार करणं स्वच्छतेच्या दृष्टीने फारच नुकसानकारक ठरू शकतो. टॉवेल नियमितपणे धुणं तर गरजेचं आहेच, पण सोबतच तो कधी बदलावा हेही माहीत असणं महत्वाचं आहे.
अस्वच्छ किंवा जुन्या टॉवेलने नुकसान
Towelsupercenter च्या रिपोर्टनुसार, अनेक लोकांना असं वाटतं की, आंघोळ केल्यावर किंवा हात धुतल्यावर शरीर साफ होतं, त्यामुळे टॉवेलही साफ राहत असेल. पण सत्य जरा वेगळं असतं. जेव्हा आपण टॉवेलने शरीर किंवा हात-पाय पुसतो तेव्हा ओलावा, डेड स्किन सेल्स, तेल आणि मळ - माती टॉवेलच्या धाग्यांमध्ये अडकून बसते. टॉवेलमध्ये पाणी शोषलं जातं. पण टॉवेल वाळायला बराच वेळ लागतो. टॉवेल ओला असताना त्यात बॅक्टेरिया, फंगस आणि यीस्टसारखे सूक्ष्म जीव वाढू लागतात. हे डोळ्यांना दिसत नाहीत, पण वेळेनुसार ते वाढतात. ज्यामुळे त्वचेला इन्फेक्शन, पिंपल्स, खाज, रॅशेज, लाल चट्टे किंवा एथलीट फुटसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
किती दिवसांनी धुवावा टॉवेल?
टॉवेलबाबतची एक चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी वापरल्यानंतर तो धुण्याची गरज पडत नाही. एक्सपर्ट सांगतात की, सामान्यपणे आंघोळीसाठी वापरला जाणारा टॉवेल ३ ते ४ वापरानंतर धुवायला हवा. हँड टॉवेल जास्त वेळा धुवायला हवा, कारण त्याला दिवसभर अनेकदा हात पुसले जातात. पण काही स्थितींमध्ये टॉवेल एकदा वापरल्यानंतर धुवायला हवा. जसे की, घरात कुणी आजारी असेल, जिममध्ये वापरला गेलेला टॉवेल. आजारी असलेल्या व्यक्तीचा टॉवेल तर रोज गरम पाण्याने धुवायला हवा. लहान मुलांचे टॉवेल रोज धुवायला हवेत.
आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे टॉवेल ठेवण्याची जागा. टॉवेल बंद ठिकाणावर म्हणजे जसे की, बाथरूम, बेडरूममध्ये ठेवत असाल तर ते लवकर वाळणार नाहीत. टॉवेल नेहमी हवेशीर जागी ठेवावे आणि उन्हात वाळत घालावेत. कॉटनचे टॉवेल नियमितपणे धुवायला हवेत.
किती दिवसांनी बदलावा टॉवेल?
एक्सपर्ट Jennifer Adams यांच्यानुसार, सामान्यपणे असा सल्ला दिला जातो की, आंघोळीनंतर वापरले जाणारे टॉवेल दर १ ते २ वर्षांनी बदलायला हवेत. फार फार तर एकच टॉवेल ३ वर्ष वापरू शकता. सतत धुतल्याने आणि नियमित वापराने टॉवेलची पाणी शोषूण घेण्याची क्षमता कमी होते. टॉवेलचे धागेही कमजोर होतात. तसेच ते आधीसारखे मुलायमही राहत नाहीत. जर आपल्याला वाटत असेल की, टॉवेल जास्त काळ चांगले रहावेत, तर फॅब्रिक सॉफ्टनरचा वापर करावा.
