Kidney Health Tips : किडनी शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक असतात. किडनी शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्याचं काम करतात. तसेच शरीरात इलेक्ट्रोलाइट्सचं बॅलन्स, सोडिअम आणि पोटॅशिअम कंट्रोल करण्याचं देखील काम किडनी करतात. इतकंच नाही तर अनेक हार्मोन्स बनवण्यात आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यात किडनीची महत्वाची भूमिका असते.
पण आपल्याच काही चुकांमुळे किडनीची ही वेगवेगळी कामं प्रभावित होतात. किडनीचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पाणी (Water For Kidney) खूप महत्वाचं ठरतं. पण बरेच लोक असे असतात जे दिवसभर पाणी भरपूर पिण्याकडे गंभीरतेने बघत नाहीत. अशात त्यांच्या किडनीमध्ये बिघाड होतो. जेव्हा किडनीचे फिल्टर योग्यपणे काम करत नाही, तेव्हा शरीरातील इतरही अवयव प्रभावित होतात. अशात किडनी निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी दिवसभरात किती पाणी प्यावं यााबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
एका दिवसात किती पाणी प्यावं?
डॉक्टर संजीव सक्सेना यांनी अलिकडेच एका वेबसाइटला सांगितलं की, किडनी हेल्दी ठेवण्यासाठी पाण्याचं असं काही प्रमाण ठरलेलं नाहीये. पाण्याचं प्रमाण हे आपल्या कामावर आणि अॅक्टिव्हिटीवर अवलंबून असतं. शरीर स्वत:हून सांगत की, किती पाणी पिण्याची गरज आहे. शरीरात पाणी कमी झाल्यावर शरीर तहान लागल्याचा संकेत देतं. तरीही एका व्यक्तीनं दिवसभरात कमीत कमी २ लीटर पाणी प्यायला हंव. ७०० ते ८०० मिली लीटर पाणी शरीरासाठी आवश्यक असतं. पाणी किती प्यावं हे आपल्या कामावर, वातावरणावर, वयावर आणि खाण्यावर अवलंबून असतं.
जास्त पाणीही धोक्याचं
आपण अनेकदा पाहिलं असेल की, बऱ्याच लोकांना एकाचवेळी भरपूर पाणी पिण्याची सवय असते. सकाळी झोपेतून उठल्यावर ते १ ते २ लीटर पाणी पितात. ही सवय चुकीची आहे. एकाचवेळी भरपूर पाणी प्यायल्यावर किडनीवर अधिक दबाव पडतो. त्यामुळे पाणी दिवसभर थोडं थोडं पित रहायला हवं. असं केल्यानं शरीर हायड्रेट राहतं आणि किडनीवर दबावही पडत नाही.