नारळ पाणी हे नॅचरल एनर्जी ड्रिंक आहे. उन्हाळ्यात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण नारळ पाणी पितात. ते शरीराला हायड्रेट करतं आणि थकवा दूर करण्यास मदत करतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, नारळ पाण्यामुळे तुमच्या ब्लड शुगर लेव्हलवर काय परिणाम होतो? प्रामुख्याने डायबेटीसच्या रुग्णांसाठी नारळ पाणी किती चांगलं आहे हे जाणून घेऊया...
नारळ पाण्यात किती असते नॅचरल शुगर?
नारळ पाण्यात नैसर्गिक गोडवा असतो, जो प्रामुख्याने ग्लुकोज आणि फ्रुक्टोजसारख्या घटकांपासून येतो. एका मध्यम आकाराच्या नारळामध्ये सुमारे २००-२५० मिली पाणी असतं. ज्यामध्ये जवळपास ५-६ ग्रॅम नॅचरल शुगर असू शकते. हे प्रमाण फार जास्त नाही. अशा परिस्थितीत त्याचं योग्य प्रमाणात सेवन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का?
नारळ पाण्यात साखरेचं प्रमाण कमी असतं आणि ते लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले ड्रिंक आहे. याचा अर्थ असा की ते ब्लड शुगर लेव्हल हळूहळू वाढवतं, ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढण्याचा धोका कमी होतो.
डायबेटीसच्या रुग्णांनी प्रत्येक प्रकारच्या गोड पदार्थांवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. जर एखादी व्यक्ती दिवसातून अनेक वेळा किंवा जास्त प्रमाणात नारळ पाणी पित असेल तर त्याचा परिणाम त्याच्या ब्लड शुगर लेव्हलवर होऊ शकतो.
नारळ पाणी पिण्याचे फायदे
नारळ पाण्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियमसारखे घटक असतात, जे हृदय आणि स्नायूंना चांगले कार्य करण्यास मदत करतात.
नारळाच्या पाण्यात फॅट नसतात आणि त्यातील कॅलरीज देखील खूप कमी असतात.
लठ्ठपणा कमी करण्यास आणि वजन नियंत्रित करण्यास मदत होते, जे खूप महत्त्वाचं आहे.
काही रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे की, नारळ पाण्यात असलेलं अँटीऑक्सिडंट्स शरीराची इन्सुलिन वापरण्याची क्षमता सुधारू शकतं.