थंड वातावरण, सततच्या शिंका आणि बंद नाक. सर्दीकडे आपण आजार म्हणून पाहतच नाही. पण सर्दी जर बराच काळ टिकली तर अगदी हैराण करुन सोडते. सारखे नाक वाहत राहते आणि त्यामुळे साधी रोजची कामं करतानाही त्रास होतो. विविध उपाय आपण करुन पाहतो. (home remedies for runny nose, easy and tasty homemade traditional drink, healthy food )औषधे तर घेतोच मात्र अनेकदा सर्दी तात्पुरती बरी होते आणि नंतर पुन्हा वाढते. अशी बरी न होणारी सर्दी झाल्यावर मग आठवते ती एकच गोष्ट. लहानपणी पावसात भिजल्यावर अशी सर्दी झाल्यावर आईचा पटका आणि तिने दिलेला काढाच कामी यायचा. आजी-आईकडून ऐकलेली ही घरगुती पारंपरिक रेसिपी खरं तर औषधापेक्षा अधिक चविष्ट आहे. काढा म्हणजे कडूच असे काही नाही. एकदा असा काढा करुन पाहा. हा काढा शरीराला उब देतो. प्रतिकारशक्ती वाढवतो आणि श्वसनमार्ग मोकळा करतो त्यामुळे फार आराम मिळतो.
कृती : १. काढा तयार करण्यासाठी आधी एका पातेल्यात दीड ते दोन ग्लास पाणी उकळायला ठेवायचे. त्यात ठेचलेलं आलं घाला आणि आलं उकळू द्या. कारण आलं शरीरातील थंडी घालवण्यास मदत करतं.
२. नंतर त्यात काळीमिरी घाला आणि काही लवंगा घाला. मिरीमुळे घसा मोकळा होतो आणि लवंगेतून सुगंधासोबतच औषधी गुण मिळतात.
३. त्यानंतर दालचिनी घाला. पूड असेल तर आणखी उत्तम. दालचिनी शरीराला उष्णता देते. काही तुळशीची पाने घाला. काढ्याचा सुगंध अधिक मोहक होतो. तसेच तुळस आरोग्यासाठी फार चांगली असते.
४. त्यात थोडा गूळ घाला आणि काढा उकळू द्या. जेवढे पाणी घेतले होते त्याच्या निम्मे पाणी झाल्यावर गॅस बंद करा. काढा उकळल्यावर गाळून घ्यायचा. गरमागरम प्यायचा. जरा तिखट- गोड अशा चवीचा लागतो. नक्की करुन पाहा.
सर्दी लवकर बरी होण्यास मदत होतेच. शरीराला उब मिळाल्यामुळे डोकेदुखी, अंगदुखी आणि नाक बंद होण्याची तक्रारही कमी होते. असा हा चविष्ट आणि आरोग्यदायी काढा नक्की करा. आठवडाभर रोज प्या. सर्दी गायब होईल.