सणासुदीच्या काळात डीजे आणि लाऊडस्पीकरचा आवाज सर्वत्र असतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की डीजेचा मोठा आवाज जीवघेणा ठरू शकतो. अनेकदा घराजवळ डीजे वाजत असल्यास लहान मुलांसह वडीलधाऱ्यांना देखील खूप त्रास होतो. त्यांची तब्येत अचानक बिघडते. काहींना तर डीजेच्या आवाजामुळे हार्ट अटॅक आला. अशा अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. डीजेच्या मोठ्या आवाजाचा आरोग्यावर घातक परिणाम होतो.
आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या आवाजात डीजे किंवा खूप जास्त डेसिबल असलेलं म्युझिकचा फक्त कानांवरच परिणाम करत नाही तर थेट हृदयाच्या ठोक्यांवरही परिणाम होतो. हृदयाचे ठोके मज्जासंस्थेद्वारे नियंत्रित केले जातात. जेव्हा मोठा आवाज अचानक कानांपर्यंत पोहोचतो तेव्हा शरीर स्ट्रेस रिस्पॉन्स एक्टिव्हेट करतं. याचा अर्थ शरीर त्याला धोक्याचा संकेत म्हणून समजतं आणि एड्रेनालिन हार्मोन रिलीज करतं. यामुळे हृदयाचे ठोके जलद होतात, ब्लड प्रेशर अचानक वाढू शकतो. या परिस्थिती हार्ट अटॅक येऊ शकतो.
हार्ट अटॅकचा धोका दुप्पट
रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की, ८५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजात दीर्घकाळ राहिल्याने हृदयाचं आरोग्य धोक्यात येतं. डीजेच्या आवाजाची पातळी अनेकदा १००-१२० डेसिबलपर्यंत पोहोचते, जी अत्यंत धोकादायक मानली जाते. हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक हिस्ट्री किंवा डायबेटीस यासारखे आजार असलेल्या लोकांवर याचा जास्त परिणाम होतो. मोठ्या आवाजामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावू शकतात, ज्यामुळे हृदयावर अचानक ताण येतो आणि हार्ट अटॅकचा धोका दुप्पट होतो.
फुटू शकते मेंदूची नस
रिसर्चमधून असंही दिसून आलं आहे की, हाय डेसिबल आवाज हृदयासाठी तसेच मेंदूसाठी हानिकारक आहे. त्यामुळे ताण निर्माण होतो, ब्ल़ड प्रेशर वाढतं. यामुळे मेंदूची नस फुटू शकते. डीजेच्या आवाजामुळे ब्रेन हॅमरेजचा मोठा धोका आहे. भारतात २०२४ मध्ये नोंदवलेल्या एका प्रकरणात असं दिसून आलं की, अत्यंत मोठ्या आवाजातील डीजेमुळे आधी कोणतीही आरोग्य समस्या नसलेल्या व्यक्तीच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला.