High Blood Pressure in Children : काही वर्षांपूर्वीपर्यंत उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर फक्त मोठ्यांची समस्या होती. पण आता परिस्थिती धक्कादायक आहे. या शतकाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत बाळांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये हायपरटेंशनचे प्रमाण दुप्पट झाले आहे. अनेक मुलांमध्ये तर कोणतंही लक्षण दिसत नाही आणि समस्या आतून गंभीर रूप घेते. अशात युवावस्थेत पोहोचण्याआधीच त्यांना हार्ट डिसीज, किडनीचे आजार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
जागतिक आकडे सांगतात की, स्थिती गंभीर आहे. लॅन्सेटच्या ताज्या अहवालानुसार जगभरात 11.4 कोटी मुलं हायपरटेंशनच्या विळख्यात आहेत. ही संख्या इतक्या वेगाने वाढत आहे की, आरोग्य व्यवस्थेला आणि पालकांना लगेच सजग होण्याची गरज आहे. विशेषज्ञ सांगतात की, 14 वर्षांच्या आसपास, विशेषतः मुलांमध्ये, रक्तदाब वेगानं वाढणार असं दिसतं. या टप्प्यावर नियमित तपासणी अत्यावश्यक आहे.
काय आहेत कारणं?
सगळ्यात मोठं कारण म्हणजे बालपणी वाढतंय ते अवाजवी वजन. हे डॉक्टरांचे स्पष्ट मत आहे. लठ्ठपणाने ग्रस्त दर 5 पैकी 1 मुलाला उच्च रक्तदाब असतो, आणि त्यातील निम्म्यांना ते असल्याचं कळतही नाही. शहरी मुलांमध्ये तर 20% मुलं लठ्ठपणाच्या श्रेणीत आहेत. यासोबतच टाइप-2 डायबिटीज, दमा, मानसिक ताण या समस्या तर वाढतातच.
का वाढतो मुलांमध्ये रक्तदाब?
1) जीवनशैलीतील बिघाड
मोबाईल-टीव्हीसमोर जास्त वेळ, आउटडोअर खेळांचा अभाव, नीट झोप न मिळणे, अभ्यासाचा ताण
2) चुकीचे खाद्यपदार्थ
फास्ट फूड, चिप्स, फ्राइज, पॅक्ड स्नॅक्स, जास्त साखर, कमी फळं-भाज्या खाणं, जास्त मीठ
3) शरीरातील आजार
किडनीचे आजार, थायरॉईड विकार, कुशिंग सिंड्रोम, जन्मजात अड्रेनल हायपरप्लासिया, हार्टच्या रक्तवाहिन्यांच्या जन्मजात समस्या
4) औषधांचे दुष्परिणाम
स्टेरॉईड्स, गर्भनिरोधक गोळ्या, काही नशेची द्रव्ये, स्लीप एपनिया
कोणती मुलं सर्वात जास्त धोक्यात?
ज्या कुटुंबात हायपरटेंशनचा इतिहास आहे. जास्त वजन / लठ्ठ मुलं, कमी हालचाल करणारी मुलं, जास्त स्क्रीन टाइम, कमी झोप घेणारी मुलं, ज्यांना आधीपासून किडनी किंवा हार्मोनसंबंधी समस्या आहेत.
बचाव कसा करायचा?
- मुलांचा दरवर्षी BP आणि BMI तपासला पाहिजे. हे आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे.
- संतुलित आणि पौष्टिक आहार द्या. कमी मीठ, कमी साखर द्या. ताजे फळे-भाज्या, घरगुती जेवण महत्वाचे.
- रोज 45–60 मिनिटं आउटडोर गेम खेळले पाहिजे. खेळामुळे वजन नियंत्रणात आणि हृदय निरोगी राहते.
- झोप पूर्ण मिळणं अत्यावश्यक आहे. रोज किमान 8–9 तास झोप हवी.
- मानसिक ताण कमी करा. अनावश्यक अभ्यासाचं दडपण टाळा.
