तापमान सतत वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य निरोगी ठेवणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. जास्त घाम येणं डिहायड्रेशनचं कारण बनू शकतं, ज्यामुळे अशक्तपणा, थकवा आणि चक्कर येणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. 'थ्री ड्रिंक थिअरी' (Three Drink Theory) तुम्हाला यामध्ये मदत करू शकते. हा नियम काय आहे आणि तो शरीरासाठी कसा फायदेशीर ठरतो हे जाणून घेऊया...
शरीराला हायड्रेटेड ठेवणं महत्त्वाचं
जेव्हा आपण हायड्रेटेड राहतो, म्हणजेच शरीरात योग्य प्रमाणात पाणी असतं, तेव्हा आपली किडनी चांगल्याप्रकारे कार्य करतं. यासोबतच शरीरातून विषारी पदार्थ देखील बाहेर पडतात. हायड्रेटेड राहिल्याने एनर्जी वाढते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, बद्धकोष्ठता आणि डोकेदुखीसारख्या समस्या कमी होतात, शरीर नैसर्गिकरित्या स्वतःला डिटॉक्स करतं.
थ्री ड्रिंक थिअरी काय आहे?
आपल्या शरीराचा ५०-७०% भाग पाण्याने बनलेला असतो. शरीरातील लहान घटकांना म्हणजेच पेशींना योग्यरित्या कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. जेव्हा पाण्याचे सेवन कमी होते तेव्हा या पेशी कमकुवत होतात आणि शरीर थकू लागतं, म्हणून दिवसभर पाणी पित राहणं खूप महत्त्वाचं आहे.'थ्री ड्रिंक थिअरी' हा स्वतःला हायड्रेटेड ठेवण्याचा एक सोपा मार्ग आहे. यामध्ये दिवसभरात तीन प्रकारचे पेय पिण्याचा सल्ला दिला जातो.
साधं पाणी
दिवसातून कमीत कमी ८-१० ग्लास साधं पाणी प्या. जर तुम्हाला साधं पाणी प्यायला आवडत नसेल तर तुम्ही त्यात लिंबू, बडीशेप, पुदिना, दालचिनी किंवा चिया सी़ड्स घालू शकता. यामुळे चव आणि पोषण दोन्ही मिळेल.
ज्यूस आणि सूप
फळं आणि भाज्यांचा ज्यूस किंवा सूपमधून शरीराला मिनरल्स आणि पाणी दोन्ही मिळतं. जसं नारळ पाणी, कलिंगड, संत्री, पपई, काकडी, टोमॅटो, पालक, गाजर इत्यादी. हे तुम्ही सॅलडमध्ये देखील खाऊ शकतात.
तुमचं आवडीचं पेय
चहा, कॉफी, दूध, लस्सी किंवा ताक यांसारखे पेय देखील शरीरात द्रवपदार्थाचं प्रमाण टिकवून ठेवतात. कॅफिनचे प्रमाण मर्यादित असणं गरजेचं आहे. दिवसातून २-३ कपपेक्षा जास्त चहा कॉफी घेऊ नका. अन्यथा फायद्याऐवजी नुकसान देखील होऊ शकतं.