Join us

तुमचंही सतत डोकं दुखत असेल तर वेळीच व्हा सावध; 'या' गंभीर आजाराचा मोठा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 13:03 IST

वारंवार डोकेदुखीकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका.

वारंवार डोकेदुखीकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. हे ब्रेन ट्यूमरचं लक्षण असू शकतं. आकडेवारीनुसार, ब्रेन ट्यूमरमुळे दरवर्षी सुमारे २.५ लाख लोकांचा मृत्यू होतो. २०२० मध्ये या आजाराने २.४६ लाख लोकांचा बळी घेतला. आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, काही वेळा ट्यूमर इतका हळूहळू वाढतो की त्याची लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे ते अधिक धोकादायक ठरू शकतं. डोकेदुखी वारंवार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

ब्रेन ट्यूमर म्हणजे काय?

ब्रेन ट्यूमरमध्ये, मेंदूच्या आजूबाजूच्या पेशी अनियंत्रित पद्धतीने वाढतात, ज्यामुळे कॅन्सर होतो. अभ्यासानुसार, मेंदूमध्ये १२० पेक्षा जास्त प्रकारचे ट्यूमर तयार होऊ शकतात. कुटुंबातील कोणाला ब्रेन ट्युमर असेल तर काळजी घेण्याची गरज आहे. याशिवाय प्लास्टिक आणि केमिकल्स उद्योगात काम करणाऱ्यांनाही सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच विविध पर्यावरणीय परिस्थितींसह जीवनशैली आणि आहारातील अडथळे यामुळेही समस्या वाढू शकतात.

डोकेदुखीकडे करू नका दुर्लक्ष 

ब्रेन ट्यूमरमुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे डोकेदुखी, जी सकाळी वाढते किंवा वारंवार जाणवते. असं झाल्यास, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.

ब्रेन ट्यूमरची लक्षणं

- डोक्यात वारंवार वेदना होणं

- मळमळ आणि उलटीसारखं वाटणं

- डोळ्यांच्या समस्या, जसं की अंधुक दृष्टी

- हात किंवा पायामध्ये वेदना

- बोलण्यामध्ये अडचण

-  स्मरणशक्ती कमी होणं

- अनेकदा चक्कर येणं

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ब्रेन ट्यूमरची सर्व प्रकरणे कॅन्सरचीच आहेत असं नाही. वेळेवर उपचार करून त्याचा धोका कमी करता येतो. तुमचं वय जास्त असेल किंवा लठ्ठ असाल किंवा कोणत्याही केमिकल्सच्या संपर्कात असाल, तर सतर्क राहण्याची गरज आहे.  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य