Join us

Health Tips: कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट पसरतोय, घाबरू नका पण 'या' तीन पद्धतीने घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 12:13 IST

Health Tips: गेल्या काही दिवसात देशभरात २७०० लोकांना कोरोनाची लागण झाली असून ७ जण मृत्युमुखी पडले आहेत; अशावेळी काळजीपेक्षा सावधगिरी महत्त्वाची!

कोरोना, कोव्हीड, लॉकडाऊन हे शब्द आपल्याला माहीतही नव्हते, पण २०२० ते २०२२ या शब्दांनी जो धुमाकूळ घातला, त्यामुळे या शब्दांची मनात दहशत निर्माण झाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे तो परत आलाय आणि एव्हाना त्याने ७ बळी सुद्धा घेतले आहेत. यावेळी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे नाव आहे, LF. 7 आणि NB1.8. सुमारे २७०० हून अधिक लोकांना त्याची लागण झाली आहे. तो झपाट्याने पसरत आहे. नाव नवीन असले तरी लक्षण जुनेच आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी! पावसाळ्यात हे आजार सामान्य असले तरी ते अंगावर न काढता त्याचा वेळीच इलाज करणे गरजेचे आहे. एकदा दुधाने हात पोळले आहेत, तर ताकही फुंकुनच पिणे चांगले, नाही का? यासाठी डॉ. रोहित साने यांनी तीन प्रकारे काळजी घ्या असे सांगितले आहे. 

सकाळी लवकर उठा, प्राणायाम आणि एरोबिक्स व्यायाम करा : 

सकाळी लवकर उठून प्राणायाम करण्यामुळे शुद्ध हवा शरीराला मिळेल. तसेच सूर्यप्रकाशात व्यायाम केला तर त्याचाही शरीराला उपयोग होईल. व्हिटॅमिन डी मिळेल. तसेच एरोबिक्स व्यायामाने हृदय, फुप्फुस यांच्याकडे जाणारा रक्तप्रवाह सुरळीतपणे सुरु राहतो, त्यामुळे श्वसनामुळे होणाऱ्या विकारांची भीती राहत नाही. 

हेल्दी डाएट ठेवा : 

बाहेरचे अन्नपदार्थ खाऊ नका. शक्य तेवढे घरी बनवलेले ताजे अन्न खा. जेवणात प्रथिनांचा जास्त वापर करा. फळं तसेच फळभाज्यांचा आणि काकडी, टोमॅटो, बीट, गाजर यांच्या कोशिंबिरींचे सेवन करा. सी व्हिटॅमिन मिळावे यासाठी लिंबू, संत्र, मोसंबी, आवळा, पेरू यांचेही दररोज सेवन करायला विसरू नका. 

स्वच्छता राखा : 

कोरोना काळात हात धुण्याचे महत्त्व आपल्याला कळले आहेच, ती सवय अंगात बाणून घ्या आणि मास्क वापरा, सॅनिटायजर वापरा. घरात स्वच्छता ठेवा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. शक्य तेवढी ही माहिती आपल्या मित्र परिवाराला न विसरता शेअर करा. 

टॅग्स : कोरोना वायरस बातम्याहेल्थ टिप्सआरोग्य