उन्हाळा म्हटला की आपण साधारणपणे त्वचेचा काळपटपणा (Tanning) किंवा घामाचा विचार करतो. पण अनेकांना या दिवसांत टाचांना भेगा पडण्याचा त्रास होतो. थंडीत टाचा फुटणे सामान्य आहे, पण उन्हाळ्यात टाचांच्या भेगा वाढण्यामागे काही विशिष्ट शास्त्रीय आणि व्यावहारिक कारणे आहेत, ते जाणून घेत कोणते उपाय करता येतील ते पाहू.
उन्हाळ्यात टाचांच्या भेगा वाढण्याची प्रमुख कारणे
चुकीच्या चपलांचा वापर: उन्हाळ्यात आपण सहसा स्लिपर किंवा सँडल्स वापरतो. यामुळे टाचा थेट कोरड्या हवेच्या आणि धुळीच्या संपर्कात येतात. हवेमुळे टाचेतील ओलावा वेगाने शोषला जातो आणि त्वचा कोरडी होऊन तिला भेगा पडतात.
डिहायड्रेशन (पाण्याची कमतरता): शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले की त्याचा परिणाम त्वचेवर होतो. टाचांची त्वचा शरीरातील इतर भागांच्या तुलनेत जाड असते, त्यामुळे ओलावा कमी होताच ती कडक होते आणि फाटू लागते.
अति उष्णता आणि घाम: पायांना येणारा घाम हवेमुळे लवकर सुकतो, ज्यामुळे त्वचेचा नैसर्गिक तेलकटपणा (Natural Oils) नष्ट होतो. यामुळेही टाचा कोरड्या पडून त्याला भेगा पडतात.
अनवाणी चालणे: गरम फरशीवर किंवा जमिनीवर अनवाणी चालल्यामुळे टाचांवरील ताण वाढतो आणि उष्णतेमुळे त्वचा कोरडी पडते. पायांची त्वचा रुक्ष होते आणि टाचा भेगाळतात.
टाचांच्या भेगा दूर करण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय
१. कोमट पाण्याचा शेक (Foot Soak)
रात्री झोपण्यापूर्वी एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात थोडे सैंधव मीठ आणि लिंबाचा रस टाका. १५-२० मिनिटे पाय त्यात भिजवून ठेवा. यामुळे मृत त्वचा मऊ होईल. त्यानंतर प्युमिस स्टोनने (Pumice Stone) टाचा हलक्या हाताने घासून घ्या.
२. खोबरेल तेल किंवा व्हॅसलिनचा मसाज
पाय धुतल्यानंतर टाचांना खोबरेल तेल किंवा व्हॅसलिन लावून ५ मिनिटे मसाज करा. यामुळे त्वचेला खोलवर ओलावा मिळतो. मसाज केल्यावर सुती सॉक्स घालून झोपल्यास अधिक फायदा होतो.
३. केळीचा लेप
पिकलेले केळे मॅश करून त्याचा लेप भेगा पडलेल्या टाचांवर लावा. १५-२० मिनिटांनी पाय धुवून टाका. केळ्यातील पोषक घटक त्वचेला मऊ करण्यास मदत करतात.
४. भरपूर पाणी प्या
केवळ वरून क्रीम लावून उपयोग नाही, तर शरीरातून त्वचा हायड्रेटेड असणे गरजेचे आहे. दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्या. उन्हाळ्यात पाण्यामुळे तुमचे एकूणच आरोग्य संतुलित राहते आणि आरोग्याच्या किरकोळ तक्रारी भेडसावत नाहीत.
