सगळी दुखणी परवडली, पण दातांची दुखणी नको, हे का म्हटले जाते ते अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. प्रत्येकाला या टप्प्यातून जावेच लागते, त्यामुळे अनुभव येतो आणि सदर वाक्यामागच्या भावना लक्षात येतात. दात किडणे, ठणकणे, पडणे, फट येणे अशा अनेक समस्यांमध्ये आणखी एक तापदायक समस्या म्हणजे अक्कल दाढ येणे. बत्तीशी पूर्ण झाली की साधारण १६ ते १८ व्या वयात अक्कलदाढ येते. अनेकांना हा अनुभव वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरही येतो.
बालवयात दात येताना जेवढ्या वेदना होतात, त्याच्या कितीतरी पट वेदना अक्कलदाढ येताना होतात. कारण, बत्तीशी पूर्ण आल्यानंतर अक्कल दाढेसाठी जागाच उरत नाही. सगळ्या दंतपंक्तींच्या पाठोपाठ तिची घुसखोरी होते आणि जागेअभावी असह्य वेदना होतात.
अक्कलदाढेला अक्कल दाढ का म्हणतात?
या वयात मनुष्य सर्व साधारण पणे सर्व बाबतीत म्हणजे शारिरीक, मानसिक, सामाजिक, धार्मिक, लैंगिक इ. बाबतीत बर्या पैकी सज्ञान होतो.अगोदरच्या वयात पोरकट पणा जास्त असतो.थोडक्यात पुरेशी अक्कल त्या वयात येते म्हणून त्या वयात उगवणाऱ्या दाढांना अक्कल दाढा म्हणतात. इंग्लिशमध्येही त्याला 'विस्डम टीथ' असे नाव आहे. विस्डम अर्थात शहाणपण! या वयात ते येणं अपेक्षित असते. अशा या अक्कलदाढा दातांच्या शेवटच्या भागात वरील बाजूला दोन व खालील बाजूला दोन अशा उगवतात.
अक्कलदाढ कधी काढावी लागते?
>> डेंटिस्टच्या मते अक्कल दाढ सर्वांत उशिरा येते. तोपर्यत तोंडातील इतर दात आलेले असतात.
>> अक्कल दाढेमुळे इतर दातांवर काही वेळ दबाव येतो. इतर दातांना त्रास होतो. त्या दाढांना यायला जागा नसते. त्याचा इतर दातांवर परिणाम होतो.
>> काहीवेळा वेदनासुद्धा होतात, त्यावेळी मात्र एक्स रे काढून पहिला जातो आणि मग रुग्णाला होणारा त्रास पाहून अक्कल दाढ काढली जाते.
अक्कलदाढेच्या दुखण्यावर घरगुती उपाय :
>> मीठाच्या पाण्याने गुळण्या: दिवसातून दोन-तीन वेळा मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास सूज कमी होते आणि वेदना कमी होतात.
>> बर्फ: बर्फ लावल्याने सूज आणि वेदना कमी होतात.
>> लवंगाचे तेल: लवंगाचे तेल कापसाला लावून दाढदुखीच्या जागी लावल्यास वेदना कमी होतात.
>> पेरूचे पान: पेरूच्या पानांचा रस किंवा पेस्ट दुखत्या जागी लावल्यास आराम मिळतो.
>> हळद: हळदीमध्ये वेदना कमी करण्याचे गुणधर्म असतात. हळद, मीठ आणि मोहरीचे तेल एकत्र मिसळून पेस्ट तयार करा आणि नंतर प्रभावित भागावर चांगले चोळा.
मात्र, अक्कलदाढेचे दुखणे दुर्लक्षित करू नका, वेळीच प्रतिबंध करा अन्यथा ते दुखणे पाहून कुटुंबातले इतर सदस्य आणि डॉक्टर तुमची अक्कल काढू शकतील हे नक्की!