Sprouted vegetable : पौष्टिक आहार हा आरोग्य चांगलं ठेवण्याचा मुख्य मंत्र मानला जातो. कारण आपण जे काही खातो त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर दिसतो. आपणही अनेकदा अनुभवलं असेल की, काही भलतंच खाल्लं तर तब्येत बिघडते. पौष्टिक आहार म्हणजे काय तर वेगवेगळ्या पालेभाज्या, कडधान्य, फळं ज्यातून आपल्या शरीराला आवश्यक ते पोषक तत्व मिळतील. पालेभाज्या तर शरीरासाठी वेगवेगळ्या दृष्टींनी फायदेशीर ठरतात. पण पालेभाज्या खूप फायदेशीर असल्या तरी सुद्धा याच भाज्या आपल्याला आजारी देखील पाडू शकतात.
आता आपल्याला प्रश्न पडला असेल की, व्हिटामिन, खनिज आणि अॅंटी-ऑक्सीडेंट्स देणाऱ्या भाज्या आपल्याला आजारी कशा पाडू शकतील? आज आपण हेच समजून घेणार आहोत. जर आपण काही कोंब आलेल्या भाज्या खाल्ल्या तर असं होऊ शकतं. यात कोणत्या भाज्या येतात ते पाहुयात.
प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट डिंपल जांगड़ा यांनी यासंबंधी माहिती देणारा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की, ज्या भाज्यांना कोंब आलेले असतात, त्या भाज्या चुकूनही खाऊ नये. कारण यात विषारी तत्व आढळतात. जर या भाज्या खाल्ल्या तर तब्येत बिघडू शकते.
कांदे
बऱ्याचदा आपण पाहिलं असेल की, घरात भरून ठेवलेल्या कांद्यांना कोंब येतात. हे कोंब कापून लोक कांदे खातात. पण असं करणं नुकसानकारक ठरू शकतं. न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, कोंब आलेले कांदे अल्कलॉइड खासकरून एन-प्रोपाइल डायसल्फाइडचं उत्पादन करतात, जे लाल रक्तपेशींना नुकसान पोहोचवतात आणि यामुळे हेमोलिटिक अॅनीमिया ही समस्या होते. याच्या लक्षणांमध्ये मळमळ, उलटी, पोटदुखी आणि जुलाब यांचा समावेश असतो.
लसूण
कांद्यासोबतच कोंब आलेला लसूणही खाऊ नये. कोंब आलेला लसूण खाल्ल्यानं पचनासंबंधी समस्या होऊ शकतात. तसेच लाल रक्तपेशींचं देखील नुकसान होऊ शकतं.
बटाटे
बटाट्याची भाजी प्रत्येक घरांमध्ये साधारपणे आठवड्यातून ३ ते ४ वेळा खाल्ली जाते. पण जर घरात भरून ठेवलेल्या बटाट्यांना कोंब आले असतील तर ते बटाटे अजिबात खाऊ नये. कोंब आलेल्या बटाट्यांमध्ये ग्लायकोअॅल्कलॉइड्स असतात, जे बटाट्या कोंबांमध्ये आणि हिरव्या भागात असतात. हे खाल्ले तर सोलनिन पॉयझनिंग होऊ शकतं. ज्यामुळे मळमळ, उलटी, जुलाब, डोकेदुखी आणि तंत्रिकासंबंधी समस्या होऊ शकतात.