Health Research : महानगरातील रोजच्या धावपळीला कंटाळून बरेच लोक काही दिवस का होईना कुठेतरी हिल्स स्टेशनला फिरायला जातात. अशा ठिकाणांवर काही वेळ शांततेत घालवून त्यांना रिलॅक्स वाटतं. हिल्स स्टेशनला जाण्याचा ट्रेण्ड अलिकडे चांगलाच वाढला आहे. पण एका रिसर्चमधून हिल स्टेशनसंबंधी एक धक्कादायक खुलासा केला आहे. जो वाचून आपण हिल स्टेशनला जाण्याचा प्लान कदाचित कॅन्सलही कराल.
अलिकडेच करण्यात आलेल्या या रिसर्चमध्ये वेस्टर्न घाट(महाबळेश्वर) आणि पूर्व हिमालयातील ढगांमध्ये भरपूर प्रमाणात विषारी धातु आढळून आलेत. जे कॅन्सर आणि इतरही गंभीर आजाराचे कारण बनू शकतात. ढगांमध्ये आढळून आलेल्या मेटल्सच्या संपर्कात आल्यास लिव्हर, किडनी, फुप्फुसं आणि मेंदुचं नुकसान होऊ शकतं. जास्त काळ जर याच्या संपर्कात रहाल तर कॅन्सरचा धोकाही वाढतो.
काय सांगतो रिसर्च?
'सायन्स अॅडव्हांसेज' जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चनुसार, पूर्व हिमालयातील ढगांमध्ये सामान्यापेक्षा १.५ पटीने जास्त प्रदूषण आढळून आलं. या ढगांमध्ये कॅडमियम, कॉपर आणि झिंकसारखे विषारी धातुंचं प्रमाण ४० ते ६० टक्के जास्त आहे. हे धातु कॅन्सरचं कारण तर ठरतातच, सोबतच लिव्हर, किडनी, फुप्फुसं आणि हृदयासंबंधी आजारांचं देखील कारण ठरतात.
कोणत्या आजारांचा धोका?
- क्रोमिअमच्या संपर्कात आल्यानं अस्थमा, न्यूमोनिया आणि ब्रोंकायटिससारखे श्वसनासंबंधी आजार होऊ शकतात.
- कॅडमिअम, क्रोमिअम आणि निकेलच्या संपर्कात आल्यानं फुप्फुसाच्या कॅन्सरचा धोका वाढतो.
- हे विषारी तत्व मेंदू, किडनी आणि लिव्हरचं गंभीर नुकसान करू शकतात.
या रिसर्चमध्ये आढळून आलं की, लहान मुलांना यांचा धोका अधिक असतो. कारण मुलांचा या धातुंच्या संपर्कात येण्याचा धोका वयस्कांच्या तुलनेत ३० टक्के जास्त आहे.
कुठून घेतले ढगांचे सॅम्पल?
हा रिसर्च महाबळेश्वर (वेस्टर्न घाट) आणि दार्जिलिंग (पूर्व हिमालय) येथील ढगांच्या सॅम्पलवर करण्यात आला. या ढगांची पीएच लेव्हल ६.२ ते ७.० दरम्यान होती. वैज्ञानिकांचं मत आहे की, हे विषारी तत्व वाहनांमधून होणारं प्रदूषण, फॉसिल फ्यूअल जाळल्यानं आणि शहरातील कचरा जाळल्यानं पसरत आहेत.
खरंतर हा रिसर्च गंभीर समस्यांकडे इशारा करत आहे. ज्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. अशात पावसाच्या दिवसांमध्ये हिल स्टेशनवर जाणं घातक ठरू शकतं. जर जाणार असालच तर जास्त काळ तिथे थांबणं टाळलं पाहिजे.