Join us

पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 12:59 IST

आजकाल अनेक वॉशरूममध्ये टिश्यूऐवजी हँड ड्रायरचा वापर सामान्य झाला आहे, लोकांना वाटतं की हा एक आधुनिक, सोपा आणि पर्यावरणपूरक मार्ग आहे.

हात स्वच्छ धुणं हा आजारांपासून बचाव करण्याचा सर्वात सोपा आणि सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणूनच घर ते शाळा, कार्यालय, रुग्णालय, विमानतळ आणि रेस्टॉरंटपर्यंत सर्वत्र आपल्याला हात धुण्यासाठी विशेष सुविधा मिळतात, परंतु खरी समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा आपल्याला हात धुतल्यानंतर ते सुकवावे लागतात. सहसा लोक हात सुकवण्यासाठी टॉवेल, रुमाल किंवा टिश्यू वापरतात, परंतु आजकाल अनेक वॉशरूममध्ये टिश्यूऐवजी हँड ड्रायरचा वापर सामान्य झाला आहे, लोकांना वाटतं की हा एक आधुनिक, सोपा आणि पर्यावरणपूरक मार्ग आहे, परंतु अनेक रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की सार्वजनिक ठिकाणी बसवलेला हँड ड्रायर आपल्याला वाटतो तितका सुरक्षित नाही.

बायोलॉजिस्ट आणि सायंटिफिक फॅक्ट्सच्या आधारे लोकांना आरोग्याशी संबंधित माहिती देणाऱ्या डॉ. लॉरा गोंझालेझ यांनी अलीकडेच सार्वजनिक ठिकाणी बसवलेले हँड ड्रायरचे धोके लोकांना सांगितले आहेत. त्या म्हणतात की, वॉशरूम आधीच बॅक्टेरिया आणि व्हायरसनी भरलेलं असतं, जेव्हा आपण हँड ड्रायर वापरतो तेव्हा ड्रायर टॉयलेटमधून बाहेर पडणारं फ्लश एरोसोल म्हणजेच मायक्रोऑर्गनिझ्म ओढतं आणि ते थेट आपल्या स्वच्छ हातांवर येतात, म्हणजेच हात धुण्याचा काहीच फायदा होत नाही. रिसर्चमध्ये असं म्हटलं आहे की, हँड ड्रायर केवळ हात खराब करत नाहीत तर संपूर्ण बाथरूम खराब करतात.

कोणाला जास्त धोका?

मुलं आणि वृद्ध - लहान मुलं आणि वृद्धांना संसर्गाचा धोका जास्त असतो.

कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेले लोक - डायबेटीस, कॅन्सर किंवा इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, ते लवकर आजारी पडतात.

फूड इंडस्ट्री, हॉस्पिटल किंवा क्लिनिकमधील वर्कर - हे लोक दररोज रुग्ण आणि अन्नाच्या संपर्कात येतात, त्यामुळे त्यांना लवकर त्रास होऊ शकतो.

टिश्यू की हँड ड्रायर...

मेयो क्लिनिक प्रोसिडिंग्जमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चमध्ये हे स्पष्ट झालं आहे की, हात सुकविण्यासाठी टिश्यू किंवा रुमाल हा ड्रायरपेक्षा सुरक्षित आणि अधिक प्रभावी आहेत.

रुमाल, टिश्यू थेट हातावरील बॅक्टेरिया पुसून टाकतात तर एअर ड्रायर हवेत जंतू पसरवतात.

रुमाल किंवा टिश्यू बाथरूममधील बॅक्टेरिया पसरवत नाहीत.

लोक नळ बंद करण्यासाठी किंवा शौचालयाचा दरवाजा उघडण्यासाठी टिश्यू वापरू शकतात. यामुळे घाणेरड्या जागांना थेट स्पर्श करण्याची गरज नाही आणि रोगांचा धोका कमी होतो.

टिश्यू सुरक्षित का आहेत?

जागतिक आरोग्य संघटना (WHO) सारख्या मोठ्या आरोग्य संघटना म्हणतात की, हात सुकविण्यासाठी टिश्यू हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे कारण ते हातातील ओलावा लवकर शोषून घेतात.

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जंतू पसरण्याची शक्यता कमी होते.

एअर ड्रायरमुळे होणारे प्रदूषण आणि हवेत जंतू पसरण्याची समस्या देखील रोखतात.

विशेषतः विमानतळ, शाळा आणि रुग्णालये यासारख्या गर्दीच्या ठिकाणी, जेट एअर ड्रायरऐवजी टिश्यू वापरणं चांगलं, यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स