ग्रीन टी केवळ शरीराला फ्रेश करत नाही तर ती तुमच्या मानसिक आरोग्यासाठी वरदान ठरू शकते. अलीकडील संशोधनातून असं दिसून आलं आहे की, ग्रीन टीचे नियमित सेवन केल्याने मानसिक आजारांचा धोका कमी होतो. याद्वारे अल्झायमरसारख्या धोकादायक आजारांना रोखता येतं आणि मानसिक आरोग्य देखील मजबूत करता येतं.
मेंदूचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि मानसिक आजार रोखण्यासाठी ग्रीन टी खूप फायदेशीर ठरू शकते असं अभ्यासातून दिसून आलं आहे. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही दररोज तीन कप ग्रीन टी प्यायलात तर ती तुमचा मेंदू निरोगी ठेवण्यास मदत करू शकते आणि अल्झायमर आणि डिमेंशियासारख्या धोकादायक मेंदूच्या आजारांचा धोका कमी करू शकते.
ग्रीन टी मध्ये पोषक घटक
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्ससारखे पोषक घटक आढळतात, जे मेंदूसाठी फायदेशीर असतात. हे घटक मेंदूच्या पेशींना नुकसान पोहोचवणाऱ्या फ्री रॅडिकल्सचा नाश करण्यास मदत करतात आणि परिणामी मेंदूची कार्य करण्याची क्षमता सुधारते. संशोधकांच्या मते, ग्रीन टीमध्ये असलेलं कॅटेचिन हा एक प्रकारचा अँटिऑक्सिडंट आहे, मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी आणि न्यूरोलॉजिकल आजार रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
अल्झायमर, डिमेंशियाचा धोका कमी
अल्झायमर आणि डिमेंशियासारख्या आजारांना रोखण्यासाठी ग्रीन टीचं सेवन हा एक नैसर्गिक आणि सोपा उपाय असू शकतो. संशोधनात असं आढळून आलं आहे की, जे लोक नियमितपणे ग्रीन टी पितात त्यांना या आजारांचा धोका २५ ते ३० टक्क्यांनी कमी होतो. याशिवाय, ग्रीन टी प्यायल्याने मानसिक स्पष्टता वाढते आणि स्मरणशक्ती सुधारते.
ताण कमी करण्यास मदत
आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ग्रीन टी मानसिक ताण कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे मानसिक स्थिती चांगली राहते आणि नैराश्यासारख्या समस्या टाळता येतात. अभ्यासानुसार, ग्रीन टी प्यायल्याने मेंदूतील रक्ताभिसरण देखील सुधारतं, ज्यामुळे मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक पोषण आणि ऑक्सिजन मिळतो.