दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी ग्लोबल हँडवॉशिंग डे साजरा केला जात आहे. लोकांना हात धुण्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. हात धुणं हे एक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे जे आपल्याला आणि आपल्या कुटुंबांला अनेक इन्फेक्शनपासून वाचवू शकतं. तज्ज्ञ म्हणतात की, हात धुणं महत्त्वाचं असलं तरी योग्यरित्या हात धुणं अत्यंत महत्त्वाचं आहे. देशातील ९९% लोक हात धुताना काही सामान्य चुका करतात. हात धुण्याची योग्य पद्धत कोणती ते जाणून घेऊया...
हात धुताना होतात 'या' चुका
बहुतेक लोक हात धुताना अनेक चुका करतात. सर्वात मोठी चूक म्हणजे योग्य प्रमाणात साबण किंवा हँड सॅनिटायझर न वापरणं. बरेच लोक घाईघाईत खूप जास्त किंवा खूप कमी हँड सॅनिटायझर लावतात. हात धुतल्यानंतर ते नीट सुकवत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या हातांवर जंतू राहतात. घाईघाईने हात धुण्याची सवय ही देखील सर्वात सामान्य चुकांपैकी एक मानली जाते.
हात धुण्याची योग्य पद्धत
तज्ज्ञांनी किमान २० सेकंद हात धुवा असं सांगितलं आहे.
सर्वात आधी हात ओले करा. साबण किंवा लिक्विड लावा.
तुमच्या तळहातांवर, तुमच्या नखाखाली आणि तुमच्या मनगटांपर्यंत साबण लावा.
तुमचे अंगठे आणि बोटं पूर्णपणे स्वच्छ करा.
हात धुतल्यानंतर, स्वच्छ टॉवेल किंवा रुमालाने पुसा.
जर पाणी उपलब्ध नसेल, तर किमान ६० टक्के अल्कोहोल असलेलं हँड सॅनिटायझर वापरा.
हात धुणं कधी महत्त्वाचं?
तज्ज्ञांच्या मते, जेवणापूर्वी आणि नंतर हात धुणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
टॉयलेटला गेल्यानंतर हात धुवा.
आजारी व्यक्तीला स्पर्श केल्यानंतर हात धुवा.
बाहेरून घरी आल्यानंतर हात स्वच्छ धुवा.
शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर हात धुणं गरजेचं आहे.
प्राण्याला स्पर्श केल्यानंतर हात धुणं देखील महत्त्वाचं आहे.