Join us

लहान बाळांना लोकरीच्या ब्लँकेटवर झोपवण्याआधी 'हे' एकदा वाचाच; दम्याचा धोका-बाळं सतत आजारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 12:27 IST

लोकरीच्या ब्लँकेटमध्ये झोपणं लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचं समोर आलं आहे

लोकरीच्या ब्लँकेटमध्ये झोपणं लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचं समोर आलं आहे. ग्लोबल अस्थमा नेटवर्कच्या नव्या रिपोर्टनुसार, जर एक वर्षाखालील मुलांना लोकरीच्या ब्लँकेटमध्ये झोपवलं तर दम्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. तसेच लहानपणी गरज देताना दिले जाणारे अँटीबायोटिक्स, गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉलचं जास्त सेवन आणि अगदी सिझेरियन डिलिव्हरीमुळे भविष्यात मुलांना दम्याचा धोका आहे. 

देशभरातील ९ शहरांमध्ये केलेल्या या रिसर्चमध्ये १.२७ लाखांहून अधिक मुलं, तरुण आणि वयस्कर व्यक्तीचा समावेश करण्यात आला होता. लखनौशी संबंधित डेटाची सूत्र KGMU च्या बालरोग विभागाच्या माजी प्रमुख प्रा. शैली अवस्थी यांनी घेतली. अवस्थी यांनी माध्यमांना सांगितलं की, देशात मुलांमध्ये दम्याचा सरासरी प्रसार ३.१६% होता, तर लखनौमध्ये तो फक्त १.११% होता. राष्ट्रीय पातळीवर किशोरवयीन मुलांमध्ये हे प्रमाण ३.६३% आहे, तर लखनौमध्ये हे प्रमाण फक्त १.६२% आहे. 

'ही' आहेत कारणं

- घरातील ओलसरपणा.  - लहान वयात अँटीबायोटिक्सचा सतत वापर. - गरोदरपणात आईने पॅरासिटामॉल घेणे. - एक वर्षापेक्षा कमी वयाची मुलं लोकरीच्या ब्लँकेटवर झोपणे. - पाळीव प्राण्यांशी जास्त संपर्क. - मुलांमध्ये वारंवार न्यूमोनिया. - सिझेरियन प्रसूतीद्वारे जन्म. - घरातील व्यक्तीला दमा असणे.

रिसर्चमध्ये ६-७ वर्षे वयोगटातील लहान मुलं आणि १३-१४ वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश होता. शाळांद्वारे मुलांशी संपर्क साधण्यात आला आणि नंतर त्यांच्याद्वारे त्यांचे पालक आणि कुटुंबातील इतर सदस्यांना रिसर्चमध्ये समाविष्ट करण्यात आलं. यामध्ये २०,०८४ लहान मुलं, २५,८८७ किशोरवयीन मुलं आणि ८१,२९६ प्रौढांनी भाग घेतला. त्या सर्वांना दम्याशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले. त्यांची जीवनशैली आणि आरोग्य सवयी समजून घेण्यात आल्या आणि डेटाच्या आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आला.

पालकांनी घ्यावी ही खबरदारी

जर तुम्ही पालक असाल किंवा मूल लहान असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मुलांना कोणतंही औषध देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आणि लोकरीच्या ब्लँकेटसारख्या पारंपारिक गोष्टी नेहमीच फायदेशीर असतात असं नाही. म्हणून मुलांना स्वच्छ ठिकाणी झोपवणं गरजेचं आहे. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य