Join us

पावसाच्या दिवसात सतत होणारा सर्दी-पडसा 'या' नॅचरल उपायांनी लगेच पळवा, वाटेल फ्रेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 10:06 IST

Monsoon Health Tips : या दिवसांमध्ये सतत होणाऱ्या सर्दी-पडस्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायही करू शकता. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Monsoon Health Tips :  सगळीकडेच आता पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. उकाडा जाऊन आता गारवा आणि मातीचा सुगंध पसरला आहे. वातावरणात बराच बदल झाला आहे. अर्थात वातावरण बदलाचा प्रभाव आपल्या आरोग्यावरही बघायला मिळतो. या दिवसांमध्ये सर्दी-पडस्याचा त्रास सतत होत राहतो. एकदा का सर्दी झाली तर कशातही मन लागत नाही. मग अंगदुखी आणि तापही येतो. अशात या दिवसांमध्ये सतत होणाऱ्या सर्दी-पडस्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायही करू शकता. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

लसूण

1) पावसाच्या दिवसांमध्ये जर तुमचा कान दुखत असेल तर तुम्हाला घश्यात इन्फेक्शन असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला सर्दी खोकला होऊ शकतो. अशावेळी काही लसणाच्या कळ्या घ्या, त्या ठेचून कापडात बांधा व कानात वरच्यावर  ठेवा. त्या कानात जाणार नाहीत याची काळजी घ्या.

2) लसणाच्या ४-५ कळ्या ठेचून त्या तुपात भाजून खा. हा सर्दी खोकल्यावरील एक सोपा उपाय आहे. याव्यतिरिक्त ४ लसणाच्या कळ्या, २ टोमॅटो व एका लिंबाचा रस काढून तो घेतल्यास इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते. असेच तुम्ही लसूण व टोमॅटोचे एकत्र सूप बनवून त्यात थोडेसे मीठ टाकून पिऊ शकता.

हळद 

1) घशाच्या खवखवीवर हळद अत्यंत उपयुक्त आहे. मुळातच हळद जंतुनाशक असल्याने ती संसर्ग वाढू देत नाही. ग्लासभर गरम  दुधात चिमुटभर हळद व साखर किंवा मध घालून प्या. हे दूध सर्दी – खोकला दूर करते त्याचबरोबर तुम्हाला दिवसभर उर्जा देते.

2) हळदीचा चहा सुद्धा सर्दी – खोकला दूर करतो. या चहासाठी चार कप पाण्यात एक छोटा चमचा हळद टाकून उकडा. १० मिनिटांनंतर तो गाळून घ्या व त्यात थोडेसे मध व लिंबू पिळून प्या. यामध्ये उकडताना तुम्ही तुळशीच्या पानांचा देखील वापर करू शकता.

आयुर्वेदिक काढा

हळदीच्या चहाप्रमाणेच गवती चहा, आलं, लवंग, काळामिरी व दालचीनी यांचा एकत्र काढा सर्दी खोकला बरा करतो, तसेच शरीराची रोग प्रतिकारकशक्ती सुद्धा वाढते.

कसा बनवाल काढा?

1) चार वेलची, काळीमिरीचे दाणे, लवंग, ताजं आलं व  दालचीनीचा छोटा तुकडा पातेल्याभर पाण्यात टाकून मंद आचेवर 10 -15 मिनिटे उकडा. उकडताना पातेल्यावर झाकण ठेवा. त्यानंतर हे मिश्रण गाळून ते गरम गरम प्या. गोडव्यासाठी त्यात थोडेसे मध घाला.

2) 10-15 तुळशीची पानं दीड कप पाण्यात उकडा. दहा मिनिटांनी हे मिश्रण गाळून त्यात चमचाभर लिंबाचा रस मिक्स करा. यातील व्हिटामिन सी व तुळस तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवतं.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स